पालिकेच्या निवासी डॉक्टरांसाठी सदनिका, पार्किंग, व्यायामशाळा! टोपीवाला मंडई पुनर्विकास मार्गी लागणार, ई-टेंडर प्रक्रिया सुरू

गोरेगावमधील टोपीवाला मंडईचा रखडलेला पुनर्विकास आता मार्गी लागणार असून मुंबई महापालिकेने त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. पुनर्विकासात महापालिकेच्या निवासी डॉक्टरांसाठी 16 मजली सुसज्ज अशी इमारत उभारण्यात येणार असून त्यात सदनिका, पार्किंग, सीसीटीव्ही पॅमेरे, शॉपिग सेंटर, व्यायामशाळा अशा विविध सुविधा मिळणार आहेत. यासाठी सुमारे 160 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे गोरेगावकरांना सुसज्ज अशी मंडई उपलब्ध होणार आहे.

मुंबई महापालिकेकडून गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या टोपीवाला मंडईचा पुनर्विकास केला जाणार आहे. ही मंडई 2018 मध्ये पाडण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून हा पुनर्विकास रखडला आहे. महापालिकेच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 131 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, मात्र या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली असून आता एकूण खर्च 160 कोटींवर पोहोचला आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली आहे.

टोपीवाला मार्पेटच्या इमारतीची रचना ही तळमजला अधिक तीन मजले अशी होती. पार्ंकगची व्यवस्थाही अपुरी पडत होती. त्यामुळे पुनर्विकास करताना पार्ंकगसह अधिक सुविधा कशा देता येतील यावर भर दिला जाणार आहे. यासाठी महापालिकेने ई-टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

अशा असतील सुविधा

पुनर्विकास झाल्यावर तळमजल्यासह 16 मजल्यांची ही इमारत असणार आहे. तळमजल्यावर अद्ययावत मंडई, निवासी डॉक्टरांसाठी सदनिका तर मंडईच्या पहिल्या व दुसऱया मजल्यावर पार्किंग सुविधा असेल. इमारत परिसरात सीसीटीव्ही, योग केंद्र, शॉपिंग सेंटर, सभागृह आणि व्यायामशाळा अशा सुविधा आहेत.