मोदी देवापेक्षा मोठे आहेत का? त्यांचा अहंकार मोडायला हवा, हुकूमशाही सहन करणार नाही; केजरीवाल यांचा निर्धार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्रापती व्लादीमीर पुतिन आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्याशी केली आहे. पुतिन आणि शेख हसीना यांनी हुकूमशाहीने निवडणुकीत जे केले, तेच आता मोदी करू करत आहेत, या शब्दांत केजरीवाल यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

मोदी हे देवापेक्षा मोठे आहेत का? देवाने त्याचे विश्व निर्माण केले आणि आपल्याला या ग्रहावर आणले. पण त्यांच्या मते ते विश्वाचे निर्माते आहे आणि देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यांचा अहंकार मोडायला हवा. ते तिसऱ्यांदा सत्तेत आले तर आरक्षण संपवतील. त्यामुळे आमचे हात बळकट करा. जेणेकरून संसदेत आमचा आवाज उठवता येईल, असेही केजरीवाल म्हणाले.

बांगलादेशात शेख हसीना यांनी सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले आणि निवडणुका जिंकल्या. रशियात व्लादिमीर पुतिन यांनीही तेच केले आणि प्रचंड बहुमताने विजयी झाले. आताही नरेंद्र मोदी त्याच रस्त्याने जात आहेत. लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि त्यांनी मला तुरुंगात टाकले. आमचे नेते संजय सिंह, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांनाही खोट्या खटल्यांखाली तुरुंगवासात आहेत. आमच्या चार मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यानंतर मोदी म्हणाले की, चला आता निवडणूक लढवू. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले, पक्षांची चिन्हे हिसकावून घेतली आणि म्हणाले की, चला निवडणूक लढू, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.

देशात हूकुमशाही येण्याचा धोका आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावाही केजरीवाल यांनी केला. आपण एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तुम्हा सर्वांना देश वाचवण्याचे आवाहन करण्यासाठी आपण येथे आलो आहोत, असेही केजरीवाल म्हणाले.