Pune porsche accident : अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबीनमध्ये फेकले; ससूनच्या डॉक्टरांची आर्थिक ‘सेटिंग’ उघड

ससून रूग्णालयातील फॉरेन्सीक विभागातील डॉक्टरांनी कोट्यावधी रुपयांसाठी कल्याणीनगर अपघात प्रकरणात केलेली चापलूसगिरी उघडकीस आली आहे. अल्पवयीन आरोपीला बेकसूर ठरविण्यासाठी फॉरेन्सिक विभाग प्रमुखाने मेडीकल चीफ ऑफीसरच्या मदतीने आरोपीच्या रक्ताचे नमुने थेट डस्टबीनमध्ये फेकून दिले. त्याऐवजी दुसर्‍या रूग्णाचे रक्त नमुने तपासणीसाठी दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने फॉरेन्सीक विभाग प्रमुखासह दोघा डॉक्टरांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी रविवारी (19) दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. त्यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी फॉरेन्सीक विभागातील डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. मुलाच्या रक्तचाचणीत दारूचा अंश येऊ शकतो, त्यामुळे बिल्डर विशाल अगरवालने डॉ. अजय तावरेला फोन करून आर्थिक सेटींग केली. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर तावरेने हस्तक्षेप करीत मेडीकल चीफ ऑफीसर डॉ. श्रीहरी हरलोरला फोन केला. अल्पवयीनाचे नमुने ताब्यात घेउन फेकून द्या, असे सांगितले. त्यानंतर त्याजागी दुसर्‍याच एका रुग्णाचे ब्लड सँपल तपासणीसाठी देण्यात आले. दरम्यान, डीएनए चाचणीसाठी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या वडिलांच्या रक्ताचे नमुने औंधमधील शासकीय रूग्णालयात जतन केले होते. ते नमुने मॅच झाले असून, त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

ससूनमधील सीसीटीव्ही डिव्हीआर जप्त

रक्तचाचणी करण्यासाठी अल्पवयीन मुलाला 19 मे रोजी ससूनमध्ये दाखल केले होते. त्यावेळेसचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. नेमके त्यादिवशी फॉरेन्सीक विभागात काय घडले, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी ससूनमधील सीसीटीव्हींचे डीव्हीआर जप्त केले आहेत. त्याअनुषंगाने तपास करून, दोषीविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.

ड्रग्ज तस्कर ललित पाटीलनंतर ससून पुन्हा चर्चेत

मेफेड्रॉन तस्कर ललित पाटील याला राजेशाही थाटात सांभाळण्यासाठी कोट्यावधी रूपयांची आर्थिंक देवाण-घेवाण केल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टरांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ससून रुग्णालयातील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात सुद्धा डॉक्टरांनी आर्थिंक सेटींगद्वारे कारनामा केला आहे. पैशांसाठी फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर यांनी बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी नियमबाह्य चक्क ब्लड सॅम्पलच फेकून देत यत्रंणा बिल्डरच्या दावणीला बांधली.

पहिला रिपोर्ट निगेटीव्ह आला, पोलिसांचा संशय बळावला

अल्पवयीन मुलाने मद्यपान केल्याचा पहिला रिपोर्ट ससूनमधून निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांचा संशय बळवला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मुलाचे औंध रूग्णालयात दुसर्‍यांदा ब्लड सॅम्पल घेतले होते. दरम्यान, डॉ अजय तावरेने बिल्डर विशाल अग्रवालला फोन केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार दोघा डॉक्टरांना ताब्यात घेउन चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आरोपी अल्पवयीनाचे रक्त नमुने फेकून दिल्याची कबुली दिली आहे.