दुखापत नाही, तरी रिस्क नकोय! – नीरज चोप्रा

हिंदुस्थानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा मंगळवार, 28 मे रोजी  झेक प्रजासत्ताक या देशात होणाऱ्या ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत सहभागी होणार नाही. दुखापतीमुळे नीरजने या स्पर्धेतून माघार घेतली असे वृत्त होते, मात्र मला दुखापत झालेली नाहीये, पण रिस्क नको म्हणून मी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय, असे नीरज चोप्राने स्पष्ट केले.

नीरज चोप्राने सोशल मीडियावर लिहिले की, ‘भालाफेक करताना मला मांडीच्या स्नायूचा त्रास जाणवतोय हे खरे आहे. हा त्रास मला आधीही व्हायचा, मात्र ऑलिम्पिकच्या तोंडावर मी या त्रासातही खेळत राहिलो तर त्याचे रूपांतर दुखापतीत होऊ शकते. त्यामुळे मी जायबंदी नाहीये हे आधी स्पष्ट करतोय. या थोडय़ाशा त्रासातून बरा झालो की चॅम्पियनशिप स्पर्धेत मी धडाकेबाज पुनरागमन करेन,’ असा निर्धारही नीरजने व्यक्त केला.