करुळ घाटमार्ग पाच महिने बंद; करुळ पुलाचे काम अपूर्ण, तर कॉजवेंची कामे निकृष्ट

गेले पाच महिने करुळ घाट वाहतुकीसाठी बंद करूनदेखील वैभववाडी – गगनबाडा मार्गाचे काम अपूर्ण राहिले आहे. करुळ येथील नदीवरील पुलाचे काम ही अर्धवट स्थितीत आहे. तसेच रस्ता काँक्रिटीकरणचे काम धिम्या गतीने सुरू आहे. कामाकडे दुर्लक्ष करणाऱया व निकृष्ट काम करणाऱया संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करुळ सरपंच नरेंद्र कोलते यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव यांच्याकडे केली आहे.

तळेरे-गगनबावडा या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी तब्बल 248 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. महामार्ग काँक्रिटीकरण करणे कामाला सुरुवात डिसेंबर 2023 पासून करण्यात आली. करुळ नदीवरील पुलाच्या कामाला पाच महिने झाले आहेत. तरीदेखील काम अजून अपूर्ण अवस्थेत आहे. पर्यायी मार्ग नदीतून काढण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास नदीतून सुरू असलेला प्रवास बंद होणार आहे. पुलाचे काम सुरू असल्याने गेले पाच महिने सुरू असलेल्या पर्यायी मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

प्रशासनाचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष

दिंडवणे, भट्टीवाडी व खडकवाडीपर्यंत येणाऱया नदीपात्रात रस्त्यावरील दगड-माती टाकण्यात आली आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलण्याची दाट शक्यता आहे. दगड-माती तत्काळ काढण्यात यावी. काही ठिकाणी जमीन मालकांना कोणतीही कल्पना न देता माती उत्खनन करण्यात आलेले आहे.

संरक्षक भिंतीची गरज

मार्गावर ठिकठिकाणी कॉजवे बांधण्यात आले आहेत. पाणी न मारल्याने कॉजवेच्या कठडय़ांना भेगा पडल्या आहेत. करुळ चेक नाका ते घाट पायथा यादरम्यान करण्यात आलेल्या काँक्रिटीकरण कामालादेखील काही ठिकाणी तडे गेले आहेत. खडकवाडी रस्त्यानजीक संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.