सहकारी महिलेची छळवणूक केल्याचा राग; हॉटेल कर्मचाऱ्याची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये कोंबला, सहाजणांना अटक

सहकारी कर्मचाऱ्याची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये कोंबल्याची धक्कादायक घटना पनवेलच्या पंजाबी पॅलेसमध्ये घडली आहे. अभिषेक असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी अभिषेकला लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना कोणाला कळू नये म्हणून अभिषेकचा मृतदेह फ्रीजमध्ये कोंबला. या हत्या प्रकरणात कुठलाही धागादोरा नसताना अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी सहाजणांना अटक केली. तो हॉटेलमधील सहकारी महिलेचे व्हिडीओ काढून तिला त्रास देत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर छळवणुकीमुळे संतापलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी त्याचा काटा काढला.

मुंबई-गोवा महामार्गावर अंबिवली फाट्याजवळील रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात गोणीत बांधलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासात हा मृतदेह अभिषेकचा असल्याचे समोर आले. अभिषेक हा पनवेल येथील हॉटेल पंजाबी पॅलेसमध्ये कामाला होता. याच हॉटेलमध्ये एक महिलादेखील साफसफाईचे काम करीत होती. अभिषेक हा महिलेचे व्हिडीओ बनवून तिला सतत त्रास देत होता. त्यानंतर तो काम सोडून निघून गेला.

17 मे रोजी केलेल्या कामाचा पगार घेण्यासाठी तो पुन्हा हॉटेलवर आला. त्यावेळी अभिषेकने सफाई कामगार महिलेचा मोबाईल चोरून नेला. हा सर्व प्रकार कामगार महिलेने मनोज गांगुर्डे, गणेश देशमुख, कानिफनाथ म्हात्रे, सुमित चौरे या आपल्या सहकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर मॅनेजर मनोज गांगुर्डे याने अभिषेकला संपर्क साधून 19 मे रोजी बोलावून घेतले. यावेळी तू महिलेस का त्रास दिला आणि मोबाईल का चोरी केला याबाबत जाब विचारून सर्वांनी लाथाबुक्क्यांनी त्याला खाली पाडून बेदम मारले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

असा काढला काटा…

हॉटेलच्या फ्रीजमध्ये अभिषेकचा मृतदेह कोंबला. त्यानंतर भाड्याचा टेम्पो बोलावून फ्रीज टेम्पोमध्ये घालून ग्रीन पार्क धाब्यावर ठेवला. त्यानंतर मृतदेह गोणीमध्ये भरून अनुज मोरे व त्याचा मित्र राज याने अंबिवली फाट्यावर फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी मनोज गांगुर्डे, गणेश देशमुख, कानिफनाथ म्हात्रे, सुमित चौरे, अनुज मोरे व कामगार महिला अशा सहाजणांना बेड्या ठोकल्या.