भीषण! पापुआ न्यू गिनीमध्ये अख्ख गाव दरडीखाली दबलं; 2000हून अधिक लोकांचा मृत्यू

पापुआ न्यू गिनी या देशामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. राजधानी मोरम्बीपासून 600 किलोमीटर दूर असलेल्या एंगा प्रांतातील यांबली गावावर शुक्रवारी दरड कोसळली. यामुळे अख्ख गाव दरडीखाली दबले गेले असून 2 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

यांबली गावामधील शेकडो घरांवर शुक्रवारी सकाळी डोंगराचा मोठा भाग कोसळला. या गावामध्ये जवळपास 4 हजारांहून अधिक लोकं रहात होते. या दुर्घटनेत सुरुवातीला 670 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हा आकडा वाढून 2 हजारांवर गेल्याची माहिती पापुआ न्यू गिनीच्या सीएआरई या संस्थेचे संचालक मॅकमोहन यांनी दिली.