दिल्ली डायरी – बिहारमध्ये वेगळाच ‘खेला होबे’!

>> नीलेश कुलकर्णी n [email protected]

धरसोड राजकारणामुळे यंदाच्या लोकसभेत नितीशबाबूंचा पक्ष इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. रामविलास पासवान यांचा पक्ष फोडण्याचे पातक भाजपने करूनही त्यांचे चिरंजीव चिराग हे मोदी-शहा यांच्या ‘पालखीचे भोई’ झाल्याचे बिहारी जनतेला पटलेले नाही. जीतनराम मांझी व उपेंद्र कुशवाह या रंग बदलण्यात माहीर असणाऱ्या राजकीय पैलवानांचाही सोक्षमोक्ष ही निवडणूक लावेल. एकंदरीत बिहारमध्ये वेगळाच ‘खेला होबे’ होणार असे चित्र आहे.

राजकीय सत्तेसाठीच्या तत्त्वशून्य तडजोडी आणि पह्डापह्डीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. बिहारमध्ये भाजपप्रणीत एनडीएच्या विरोधातील ‘जनतेची लहर’ तेच सांगते आहे. देशाच्या राजकारणातले एकमेवाद्वितीय ‘मिस्टर गिरगिट’ नितीश कुमार, रामविलास पासवानांचे चिरंजीव चिराग, जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाह वगैरे संधीसाधू मंडळींच्या विरोधात बिहारी जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. जनक्षोभाच्या सुळावर मित्रपक्षांना चढवून आपण नामानिराळे राहण्याची भाजपची रणनीती बिहारमध्येही दिसून येत आहे.

बिहारमधील एक्झिट पोलनुसार तिथे गेल्या वेळी 41 पैकी तब्बल 39 जागा जिंकणाऱया एनडीएला नऊ जागांचा फटका बसू शकतो असा अंदाज आहे. गमतीचा भाग म्हणजे भाजपच्या जागा कमी होत नाहीयेत, तर भाजपच्या नावेत स्वार झालेले मित्रपक्ष गटांगळ्या खाणार आहेत. बिहारमध्ये संधीसाधू राजकारणाला नाकारण्याचा जनतेचा मनसुबा दिसतो आहे. त्यातून भाजपचे आयतेच फावणार आहे. या निवडणुकीनंतर नितीश कुमारांचे राजकारण संपेल, अशी चर्चा आहे व चिराग पासवानांच्या राजकीय मर्यादा उघड होतील. पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही एका अर्थाने ‘शत प्रतिशत इष्टापत्ती’ ठरणारी आहे. नितीश कुमारांच्या पक्षाची ‘पॉलिटिकल स्पेस’ भरून काढण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. त्यामुळे हे मित्रपक्ष म्हणजे भाजपसाठी सुंठेवाचून खोकला गेला अशी स्थिती निकालानंतर राहणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये होणारा हा वेगळाचा ‘खेला होबे’ हा भाजपच्या मित्रपक्षांचा बाजार उठविणारा आहे. बिहारसह प्रत्येक राज्यात मित्रपक्षाला तोफेच्या तोंडी देऊन आपले राजकीय ईप्सित गाठण्याचा भाजपचा हा नवा ‘पॅटर्न’ निकालानंतर सगळ्यांच्याच लक्षात येईल.

जयंत सिन्हांवरचे ‘नोटीस प्रेम’

जयंत सिन्हा हे भाजपने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. हे जयंतराव पेंद्रात मंत्री वगैरेही होते हेही लोक आता विसरले आहेत. जयंत सिन्हांचे वडील यशवंत सिन्हा हे देशाचे यशस्वी अर्थमंत्री राहिले आहेत, हे लोकांच्या स्मरणात आहे. मात्र जयंत सिन्हा यांना तसे कर्तृत्व गाजविण्याची संधी फारशी मिळाली नाही. सिन्हा हे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून भाजपने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. वास्तविक मोदी-शहांच्या मनमानीविरोधात आज प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्हय़ात भाजपचे लोक पक्षाविरोधात उघडपणे काम करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित केडरदेखील मोदी-शहा यांच्या कार्यशैलीमुळे व्यथित झाले असून ‘तटस्थ’पणे लोकसभेचा मुकाबला ते पाहत आहेत. बिहारमध्ये अश्विनी चौबे यांच्यासारखा मातब्बर ब्राह्मण नेता भाजपविरोधात उघडपणे रान पेटवत आहे, तर रमादेवी यांच्यासारख्या वरिष्ठ महिला खासदार तिकीट कापल्यानंतर पक्षाविरोधात भूमिका घेत आहेत. मोदी-शहा यांचा दरारा, दबाव झुगारून हे बिनदिक्कतपणे सुरू आहे. मग बिचाऱया एकटय़ा जयंत सिन्हांची बंडखोरीच पक्षाने गांभीर्याने का घ्यावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाने जयंत सिन्हांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली आहे. वास्तविक जयंत सिन्हा यांचे तिकीट कापून भाजपने हजारीबागमधून मनीष जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. मनीष यांचे चिरंजीव करण यांनी तीन वर्षांपूर्वी चार कोटी रुपयांचा इलेक्टोरल बॉण्ड खरेदी केला होता. भाजपच्या ‘कारणे दाखवा’ नोटिसीचा जीव त्या इलेक्टोरल बॉंण्डच्या ‘पोपटा’त अडकलेला आहे.

राजस्थानच्या वाळवंटात ‘लाल बावटा’

‘डावे देशाच्या राजकारणातून हद्दपार झाले हो’, म्हणून टाळ्या पिटणाऱया मंडळींसाठी एक बॅड न्यूज आहे, ती अशी की, राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटातून पुन्हा लाल बावटा फडकण्याची चिन्हे आहेत. राजस्थानमध्ये सत्तापरिवर्तन होऊन भाजपला बहुमत मिळाले. वसुंधराराजेंना डावलून भाजपने तिथे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा या नवख्या नेत्याला संधी दिली. मात्र त्याचा राग मनात धरून वसुंधराराजे राजस्थानात पाडापाडीचे राजकारण करत आहेत. त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसेल या भीतीने अगोदरच भाजपची गाळण उडालेली आहे. त्यात राजस्थानच्या सीकरमधून माकपचे उमेदवार अमरा राम बाजी मारणार अशी हवा तयार झाल्याने भाजपचे केडर धास्तावले आहे. अमरा राम यांनी दोन वेळा भाजपचे खासदार राहिलेल्या सुमेधानंद सरस्वती यांची झोप उडवली आहे. सीकरमध्ये काँग्रेस व डाव्यांची झालेली आघाडी हे समीकरणदेखील अमरा राम यांच्या पथ्यावर पडत आहे. अमरा राम यांनी सीकरमध्ये जी ‘हवा’ निर्माण केली आहे, त्याची चर्चा उत्तरेच्या पट्टय़ात आहे. अमरा राम यांच्या प्रचारासाठी सीताराम येचुरी यांनी सभांचा तडाखाही लावला आहे. ‘‘बंगाल मे हम बचे नही. केरल मे कडी मशक्कत है. पर अमरा अगर तुमने सीकर जीत ली तो हम उत्तर भारत में फिर से जिंदा हो सकते है’’ असे भावनिक आवाहन येचुरी करताहेत. राजस्थानच्या भाजपच्या बालेकिल्ल्याला डावे धडक मारून तिथे ‘लाल सलाम’ ठोकतात काय, हे त्यामुळेच महत्त्वाचे आहे. डाव्यांच्या राजकीय जीवदानाच्या दृष्टीने सीकरची लढाई ही निर्णायक मानली जात आहे.