गोंदिया: पाण्यासाठी महिलांची शेतशिवारात भटकंती; जलजीवन मिशन योजना ठरली फोल, 95 लक्ष खर्च पाण्यात

>> सूरज बागडे, गोंदिया

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांची शेत शिवारातील भटकंती शासनाच्या विविध पाणी योजनांचा समाचार घेण्यासारखी आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर जलजीवन मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पालेवाडा या गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेने ज्या ठिकाणी पाण्याच्या मुख्य स्त्रोतासाठी विहीर खोदली ती जागा चुकीची निवडल्याने जानेवारी महिन्यातच तेथील पाणी आटले. यासह गावातील बोरवेल देखील कोरड्या पडल्याने आता येथील महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
शेत-शिवारातून महिलांना पाणी आणावे लागत आहे. तर चुकीच्या नियोजनामुळे 95 लक्ष खर्च करून देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नसेल तर शासनाच्या योजना खरचं नागरिकांसाठी राबविण्यात येतात का? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर पालेवाडा गावापासून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या कलपाथरी मध्यम प्रकल्पावर पाण्याची योजना कार्यान्वित करून पालेवाडा वासियांची तहान भागवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.