विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात सरी बरसणार

देशासह राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. एकीकडे देश उष्णतेच्या लाटेने तापला असतानाच केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे देशात एकीकडे उष्णतेची लाट तर काही ठिकाणी पावसाच्या सरी असे वातावरण दिसत आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या आठवड्यात वळीवाचा म्हणजेच मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आज मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील वातावरण आणखी तापणार आहे.

मुंबई आणि कोकणात ढगाळ हवामान असल्याने तापमानात थोडी घट झाल्याने उष्णतेने त्रासलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. या परिसरात येत्या दोन दिवसात मॉन्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच 10 जूनपर्यंत कोकण आणि मुंबईत मॉन्सूनचे आगमन होणार आहे. तर 15 जूनपर्यंत मॉन्सून राज्यभरात पसरणार आहे. त्यामुळे आता उन्हाची काहिली कमी होणार असून पावसाच्या सरी बरसणार आहेत.

हवामान खात्याज्या अंदाजानुसार पुढील 18 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच शहरात कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअसमध्ये राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळीचे सावट ओसरले असून या आठवड्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा 45 अंशांवर गेल्याने जळगाव आणि अकोलामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट् चांगलाच तापत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हे उष्ण झळांनी भाजून निघत आहेत. तर राज्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोल्यात झाली. पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. देशामध्ये राजस्थानातील बारमेरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी 48.8 अंश तापमान नोंदवण्यात आले.