मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभूत – सिंधूचे विजेतेपदाचे  स्वप्न भंगले!

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अखेर भंगले. संपूर्ण स्पर्धेत बहारदार खेळ करणाऱ्या 15 व्या मानांकित सिंधूला जेतेपदाच्या लढतीत सातव्या मानांकित चीनच्या वांग झी यी हिने हरविले. या पराभवामुळे सिंधूचे दोन वर्षांपासून रखडलेले जेतेपदाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडले.

वांग झी यी हिने तब्बल 79 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत पी. व्ही. सिंधूचा 16-21, 21-5, 21-16 असा पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दोन वेळच्या ऑलिम्पिक पकदविजेत्या सिंधूने अंतिम लढतीत पहिला गेम जिंकून झकास सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्या गेममध्ये तिने सपशेल शरणागती पत्करल्याने वांगने लढतीत पुनरागमन करण्यात यश मिळविले. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये सिंधूने एक वेळ 11-3 अशी मुसंडी मारली होती, मात्र तरीही चिनी प्रतिस्पर्धीने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करीत जेतेपदाला गवसणी घातली. हेड टू हेडमध्ये चार लढतींपैकी सिंधूचा हा दुसरा पराभव होय.

पी. व्ही. सिंधूने 2022 मध्ये सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. गतवर्षी माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सिंधूने दोन वर्षांपूर्वी याच वांग झी हिला पराभूत करून सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकाविले होते, मात्र गतवर्षी आर्कटिक ओपनमध्येच वांगकडूनच सिंधूचा पराभव झाला होता. आता मंगळवार, 28 मेपासून सिंधू सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधूला कडवे आव्हान

हिंदुस्थानची अनुभवी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू मागील काही वर्षांपासून पॅरोलिना मारिन, ताई त्जु यिंग, चेन यू फेई व अकाने यामागुची आदी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यात अपयशी ठरली होती. त्यामुळे या सर्व खेळाडूंकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधूला कडवे आव्हान मिळणार आहे, मात्र मलेशिया मास्टर्स स्पर्धेतील अंतिम लढतीपर्यंतच्या प्रवासामुळे सिंधूचे मनोबल उंचावले असेल एवढे नक्की.