‘कान्स’मध्ये हिंदुस्थानचा डंका! अनसुया सेनगुप्ता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अनसुया सेनगुप्ता हिने अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी अनसुया ही पहिलीच हिंदुस्थानी अभिनेत्री ठरली आहे. ‘शेमलेस’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘शेमलेस’ या चित्रपटाची हिंदुस्थानात फारशी चर्चा झाली नसली तरी एका पोलिसावर हल्ला केल्यानंतर दिल्लीतील वेश्यालयातून पळून जाणाऱया एका सेक्स वर्करचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

अनसुया ही मुंबईत प्रोडक्शन डिझायनर म्हणून ओळखली जाते. सध्या ती गोव्यात वास्तव्यात आहे. ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्स शोचा सेट डिझाईन करण्याचे काम तिने केले. अनसुया ही मूळची कोलकाता येथील असून तिने जाधवपूर विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले.