अर्थव्यवस्था वाढतेय तर लोकांच्या जीवनात समृद्धी का नाही? प्रियंका गांधी यांचा सवाल

देशाची अर्थव्यवस्था जर वेगाने वाढत आहे तर, लोकांच्या जीवनात समृद्धी का नाही, असा बोचरा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रविवारी येथील प्रचार सभेत भाजपच्या नेतृत्वाला विचारला.

फतेहगढ साहिब मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अमरसिंग यांच्या प्रचारसभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त सत्ता काबीज करण्यासाठी खोटे बोलून जनतेला पोकळ आश्वासने देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पंजाबमधील त्यांची ही पहिलीच सभा होती.

देशात 70 कोटी तरुण बेरोजगार आहेत आणि बेरोजगारी ही 45 वर्षांतील सर्वाधिक आहे. मोदी सरकारच्या काळात सरकारी क्षेत्रात 30 लाख पदे रिक्त आहेत, असा हल्लाबोल त्यांनी मोदी सरकारवर केला.

जनतेची प्रगती का नाही, रोजगार का नाहीत…

अर्थव्यवस्था झपाटय़ाने वाढत असल्याचे मोठे दावे मोदी करतात. मला विचारायचे आहे की ती इतक्या वेगाने वाढतेय आणि देशात प्रगती होत असेल तर तुमची जनतेची प्रगती का होत नाही? तुमच्या मुलांना रोजगार का मिळाला नाही? असे प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केले.