शारजाह चॅलेंजर बुद्धिबळ – हिंदुस्थानच्या दिव्या देशमुखला विजेतेपद

हिंदुस्थानची 19 वर्षीय महिला बुद्धिबळपटू आणि इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुख हिने सातव्या शारजाह चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दिव्याने संपूर्ण स्पर्धेत अजेय राहताना 5 विजय आणि 4 ड्रॉसह 7 गुणांची कमाई करीत जेतेपदावर आपले नाव कोरले हे विशेष! स्पर्धेत अंतिम फेरीनंतर रशियाची लेया गारीफुलिना व इराणची सिना मोवहेद यांनी प्रत्येकी 7 गुणांची कमाई केली. मात्र, सर्वोत्तम टायब्रेकच्या आधारे लेया दुसऱ्या, तर सिना तिसऱ्या स्थानावर राहिली.

अंतिम फेरीत दिव्या देशमुख पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना गारिफुलिनाविरुद्ध एक वेळ अतिशय सुस्थितीत होती. मात्र शेवटी तिने 50 चालीनंतर तिला ड्रॉवरच समाधान मानावे लागले. याचबरोबर हिंदुस्थानच्या आराध्य गर्गने अखेरच्या फेरीत उझबेकिस्तानच्या सुयारोव एम हिचा पराभव करीत 6.5 गुणांसह सहावे स्थान मिळविले. हर्ष सुरेश हिने यूएईच्या अमार सेदरानी हिचा पराभव करीत 6.5 गुणांची कमाई केली. टायब्रेकच्या आधारे ती सातव्या क्रमांकावर राहिली.

 मास्टर गटात इराणच्या दानेश्वर बर्दिया विजेता

इराणच्या दानेश्वर बर्दियाने मास्टर गटात 6.5 गुणांची कमाई करीत उत्कृष्ट टायब्रेकच्या आधारे विजेतेपद पटकावले. इतक्याच गुणांची कमाई करणाऱ्या रशियाच्या मुरजिन बोलोदर, यूएसएच्या शॅम शंकलंद व उझबेकिस्तानच्या वोखिदोव शमसिद्दीन यांनी टायब्रेकच्या निकषावर अनुक्रमे 2 ते 4 स्थानावर समाधान मानावे लागले.