30 वर्षांनंतर इतिहास रचला, कान्समध्ये ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’ला ‘ग्रँड प्रिक्स’

कान्समध्ये तब्बल 30 वर्षांनंतर हिंदुस्थानी चित्रपटाने इतिहास रचला. पायल कपाडिया दिग्दर्शित आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ चित्रपटाला ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार मिळाला. चित्रपटाच्या टीमवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

अभिनेत्री छाया कदम सध्या त्यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग गुरुवारी कान्स सोहळय़ात झाले. जगभरातील प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली. चित्रपटाला उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले. त्यानंतर या चित्रपटाने कान्स सोहळय़ात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कारावर आपले नाव कोरले. ‘पाल्मे डी ओर’ नंतर ‘ग्रँड प्रिक्स’ हा चित्रपट महोत्सवातील दुसरा सर्वात प्रतिष्ठत पुरस्कार आहे.

छाया कदम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

– पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटात कानी कुसरुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृदयू हारून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या 30 वर्षांत कान्स महोत्सवाच्या मुख्य विभागात प्रदर्शित होणारा हा पहिला हिंदुस्थानी चित्रपट ठरला. 1994 मध्ये शाजी एन करुण यांचा ‘स्वाहम’ हा कान्सच्या मुख्य विभागात पोहोचला होता.

– पायल कपाडिया लिखित ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ ही केरळमधील दोन नर्सेसची कथा आहे. कथेच्या केंद्रस्थानी नर्स प्रभा आहे, तिची भूमिका कानी कुसरुतीने साकारली आहे. छाया कदम या चित्रपटाचा भाग असल्याने मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.