आईचा अपघाती मृत्यू : 11 वर्षांच्या मुलीला 1.1 कोटी रुपयांची भरपाई

माझगाव येथे 2015 साली ट्रेलरने स्कूटरला धडक दिल्याने या अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता. तिची मुलगी रितिकाच्या वतीने अपघाती नुकसानभरपाईचा दावा करण्यात आला. त्यात आता रितिकाला न्याय मिळाला. आईचे छत्र गमावलेल्या 11 वर्षीय मुलीला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने 1.1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली. ही नुकसानभरपाई ट्रेलरचे मालक विद्याधर मिश्रा आणि विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना द्यावी लागेल.

रितिकाचे वडील अशोकन कनपथी आणि आजोबा आनंद सुबय्या राय यांनी नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा केला होता. मात्र त्यादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर रितिकाचा सांभाळ तिची आजी भानुमती आनंदराज यांनी केला. तिने आजीमार्फत न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणाने सांगितले की, या भरपाईची गणना करताना अनेक पैलूंचा विचार करणे आवश्यक आहे. रितिका 21 वर्षांची होईपर्यंत या रकमेचा मोठा भाग मुदत ठेवीमध्ये असेल. 2015 सालापासून व्याजासह सुमारे 5.50 लाख रुपये तिच्या संगोपनासाठी आणि खर्चासाठी आजीला दिले जातील.