मिठी, दहिसर नद्या पुनरुज्जीवित होणार

मिठी नदीला पूर आल्यामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

मुंबईतील नद्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मिठी नदी आणि दहिसर नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. मिठी नदी व दहिसर नदीचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून नदीत सांडपाणी सोडण्याआधी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही विभागातील नदी-नाल्यातील गाळ उपसा कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईत मिठी नदी आणि दहिसर नदी या ठिकाणी सुरू असलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून नद्यांचे पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे. मलजल प्रक्रिया पेंद्राच्या माध्यमातून नद्यांच्या पात्रात सांडपाणी मिसळण्याच्या आधीच त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. एकूण सात मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे काम मुंबईत प्रगतिपथावर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरडीसाठी संरक्षक जाळय़ा!
दरड प्रवण क्षेत्रातील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये संबंधित नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश संबंधित प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक जाळय़ा लावण्यात येणार आहेत.