चौथ्या दिवशीही शोधकार्य सुरूच डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या 16 ; अजूनही दहा कामगार बेपत्ता

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी रिअॅक्टर आणि बॉयलर फुटून झालेल्या शक्तिशाली स्फोटात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 10 कामगार बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबीयांची घालमेल सुरू आहे. भीषण स्फोटात मृत कामगारांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्यामुळे ओळख पटवणे जिकिरीचे झाले आहे. ओळख पटवण्यासाठी मृतदेहांची आणि बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतरच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिले जाणार आहेत.

अमुदान कंपनीत गुरुवारी रिअॅक्टर फुटून भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत पहिल्या दिवशी आठ कामगारांचे मृतदेह मिळाले. दुसऱ्या दिवशी ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले तर शनिवारी आणखी दोन मृतदेहांचे अवशेष मिळाले. तर आज शोधकार्य सुरू असताना अजून तीन मृतदेहांचे अवशेष मिळाले. आतापर्यंत 16 मृतदेह मिळाले आहेत. पैकी रोहिणी कदम, रिद्धी खानविलकर आणि राकेश राजपूत या कामगारांची ओळख पटल्याने त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. अजूनही 13 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यातच दहा कामगार बेपत्ता असून त्यांचा अद्याप काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे ओळख न पटलेल्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयातील रक्ताच्या नात्यातील सदस्यांचीही डीएनए टेस्ट केली जात आहे. टेस्टचा अहवाल आल्यानंतरच बेपत्ता कामगारांपैकी कोणी मृत झाला आहे का, याचा उलगडा होणार आहे.

पोलीस, अग्निशमन जवानांची कसोटी
केमिकल स्फोटामुळे मृतांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्यामुळे शोधकार्य जपून करावे लागत आहे. हे करत असताना जवानांची अक्षरशः कसोटी लागत आहे. सोमवारीही शोधकार्य सुरूच ठेवले जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांनी दिली. दरम्यान स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला याची ठोस आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. जोपर्यंत डीएनए टेस्टचा अहवाल येत नाही तोपर्यंत मृतांची संख्या सांगता येणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रोबेसच्या काळ्याकुट्ट आठवणींना आठ वर्षे पूर्ण
26 मे 2016 रोजी डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत स्फोट झाला. या दुर्घटनेत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 150 कामगार जखमी झाले. शिवाय आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या 215 जणांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. स्फोटाची झळ 3 किलोमीटर परिसराला बसली. प्रशासनाच्या अहवालानुसार 7 कोटी 43 लाख 70 हजार 990 रुपयांचे नुकसान झाले. आज स्फोटाच्या काळ्याकुट्ट आठवणीला आठ वर्षे पूर्ण झाली. धक्कादायक बाब म्हणजे नुकसानग्रस्त अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

डोंबिवलीतील कंपन्या स्थलांतरास पाताळगंगा, अंबरनाथकरांचा विरोध
रसायनी – डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटानंतर राज्य सरकारने या ठिकाणच्या धोकादायक
केमिकल कंपन्या पाताळगंगा आणि अंबरनाथ एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला अंबरनाथ आणि पाताळगंगा गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. आमच्या जीवाचे काहीच मोल नाही का, असा सवाल करत या कंपन्या येथे स्थलांतरित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बफर झोन असलेल्या भागात केमिकल कंपन्या स्थलांतरित व्हाव्यात हा सरकारचा हेतू असला तरी पाताळगंगा एमआयडीसीत बफर झोनच शिल्लक नसल्याने या कंपन्या कशा स्थलांतरित केल्या जाणार, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.