भिवंडीत भाजपविरुद्ध भाजप; कपिल पाटील करणार कथोरेंचा ‘करेक्ट’ कार्यक्रम

भिवंडी लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे विरुद्ध भाजपचे कपिल पाटील यांची लढत झाली. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने कपिल पाटील हे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भिवंडी मतदारसंघात भाजपविरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे. कथोरे व पाटील या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू असून भाजप श्रेष्ठी कोणाची कानउघाडणी करणार अशी चर्चा सुरू आहे.

20 मे रोजी भिवंडीचे मतदान पार पडले तेव्हा एका मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी पोलीस अधिकारी व निवडणूक कर्मचाऱ्यांनाच शिवीगाळ केली होती. त्यानंतर पाटील यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी पाटील यांनी मुरबाडमध्ये भाजपच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कपिल पाटील यांनी भाजपचे आमदार किसन कथोरे यांनाच धारेवर धरले.

तुमच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेत कथोरे यांचा किती वाटा आहे, असा सवाल प्रसारमाध्यमांनी करताच पाटील संतप्त झाले. ते म्हणाले की, ज्या माणसाने आपल्याविरोधात उघडपणे काम केले त्या व्यक्तीचा संबंध काय? दरम्यान कथोरे व पाटील यांच्यात पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त होत असून निकालानंतर पाटील हे कथोरे यांचाच ‘करेक्ट’ कार्यक्रम करतील, असेही बोलले जात आहे.