IPL 2024 : कोलकाता तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन; दहा वर्षांनंतर पुन्हा पटकाविले जेतेपद

कोलकाता नाईट रायडर्सने कारकीर्दीत तिसऱ्यांदा आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला. यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल सहा वेळा दोनशेहून अधिक धावसंख्या उभारणारा सनराझर्स हैदराबादचा संघ फायनलसारख्या लढतीत 113 धावांतच गारद झाला. आयपीएल फायनलच्या इतिहासातील ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. कोलकात्याने 8 फलंदाज आणि 57 चेंडू राखून हैदराबादचा धुव्वा उडविला अन् तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा आयपीएल जेतेपद पटकाविले. गोलंदाजांचा टिच्चून मारा आणि व्यंकटेश अय्यरचे तुफानी अर्धशतक ही कोलकात्याच्या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली.

व्यंकटेशचा हल्लाबोल

हैदराबादकडून मिळालेले 114 धावांचे लक्ष्य कोलकात्याने केवळ 10.3 षटकांत 2 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. पॅट कमिन्सने दुसऱ्या षटकात सुनील नरिनला (6) शाहबाज अहमदकरवी झेलबाद करून हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली, मात्र त्यानंतर रहमानुल्लाह गुरबाझ (39) व व्यंकटेश अय्यर (नाबाद 52) यांनी दुसऱर्या विकेटसाठी 45 चेंडूंत 91 धावांची भागीदारी करीत हैदराबादची गोलंदाजी निप्रभ ठरविली. शेवटी शाहबाज अहमदने गुरबाझला पायचित पकडून हैदराबादला दुसरे यश मिळवून दिले. मग व्यंकटेशने कर्णधार श्रेयस अय्यरच्या (नाबाद 6) साथीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

रस्सेल, राणाचा अचूक मारा

स्टार्क आणि वैभव अरोरा यांच्या तिखट माऱ्यानंतर आंद्रे रस्सेल व हर्षीत राणा यांनी अचूक मारा करीत हैदराबादच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली. राणाने नीतिश कुमार रेड्डीला (13) यष्टीमागे झेलबाद करून हैदराबादला चौथा हादरा दिला. 7 षटकांत 4 बाद 47 अशा संकटातून एडेन मार्करम (20) व हेन्रीक क्लासेन (16) हे हैदराबादचा डाव सावरतील अशी आशा होती, मात्र रस्सेलने मार्करमला स्टार्ककरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. मग शाहबाज अहमद (8) व अब्दुल समद (4) या आक्रमक फलंदाजांनीही निराशा केली. शाहबाजला वरुण चक्रवर्तीने सुनील नरिनकरवी झेलबाद केले, तर समदला रस्सेलने यष्टीमागे झेलबाद करून हैदराबादची अवस्था 12.4 षटकांत 7 बाद 77 अशी दयनीय केली. हा संघ धावांची शंभरीही गाठणार नाही अशी स्थाती असताना पुन्हा एकदा कर्णधार पॅट कमिन्सने 19 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 24 धावांची छोटेखानी पण देखणी खेळी करीत हैदराबादला 113 धावसंख्येपर्यंत पोहोचविले.

स्टार्कचा गुड स्टार्ट

त्याआधी, नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ 18.3 षटकांत केवळ 113 धावांवरच  बाद झाला. मिचेल स्टार्कने पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माचा भन्नाट त्रिफळा उडवून कोलकात्याला गुड स्टार्ट करून दिला. मग वैभव अरोराच्या पुढच्या षटकात ट्रव्हिस हेड यष्टीमागे हरमानुल्लाहकडे झेल देऊन गोल्डन डकचा (पहिल्याच चेंडूवर बाद) बळी ठरला. मग या धक्क्यातून हैदराबादला पुन्हा सावरता आले नाही. मग मिचेल स्टार्कने पाचव्या षटकात राहुल त्रिपाठीला (9) रमनदीपकरवी झेलबाद करून हैदराबादची आघाडीची फळी कापून काढली.

आयपीएल फायनलमध्ये कमी धावसंख्या

हैदराबाद 18.3 षटकांत 113 धावा – 2024 (विरुद्ध कोलकाता)

चेन्नई 9 बाद 125 धावा           – 2013 (विरुद्ध मुंबई)

पुणे 6 बाद 128 धावा             – 2017 (विरुद्ध मुंबई)

मुंबई 8 बाद 129 धावा           – 2017 (विरुद्ध पुणे)

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)