फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय कॉल क्रमांक ब्लॉक करा; केंद्राचे रिलायन्स, जीओ, व्होडाफोन -आयडीया आणि बीएसएनएलला आदेश

आंतरराष्ट्रीय कॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने रिलायन्स, जीओ, व्होडाफोन-आयडीया आणि बीएसएनएल या दूरसंचार कंपन्यांना संबंधित कॉल क्रमांक ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत दूरसंचार विभागाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

सायबर गुन्हे घडत असून अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हिंदुस्थानात मोबाइलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल येत आहेत. पोलिस अधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे कॉल करून फसवणूक करण्यात येत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांनी ही आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने केले आहे.

60 दिवसांत 6 लाख मोबाइल क्रमांकाचे सर्वेक्षण
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने तब्बल 6.80 लाख मोबाइल क्रमांकांचे सर्वेक्षण केले. यातील अनेक मोबाइल क्रमांक बंद होते, तर अनेक मोबाइल क्रमांकांची कागदपत्रेच बनावट आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.