विज्ञान-रंजन – पनामाची नामी ‘युक्ती’!

एकोणिसाव्या शतकातली तंत्रज्ञानासंबंधीची मराठी पुस्तकातली माहिती अभावानेच मिळते, पण मिळतच नाही असं नाही. त्यामध्ये त्या काळाला अनुसरून एखाद्या नव्या वैज्ञानिक संशोधनाविषयी अशी ‘युक्ती’ केली आहे, असे उल्लेख येतात. देशातली पहिली प्रवासी रेल्वे ट्रेन 1853 मध्ये मुंबईत सुरू झाली तेव्हा वाफेच्या इंजिनाच्या ‘युक्ती’ने चालवली जाणारी ट्रेन पाहायला मुंबईकर किती मोठय़ा संख्येने रेल्वेमार्गाच्या दुतर्फा उभे होते याची वर्णनं आहेत.

वैज्ञानिक प्रगती प्राचीन काळापासून टप्प्याटप्प्याने होत गेली ती अशा नामी ‘युक्ती’च्या आधारेच. गेल्या लेखात आपण सुएझ कालव्यामुळे सागरी प्रवासाचं अंतर कसं हजारो किलोमीटरने कमी झालं ते पाहिलं. या लेखात अशाच एका, परंतु तंत्रज्ञानाची कमाल (इंजिनीअरिंग मार्व्हल) असलेल्या उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडांच्या मधोमध असलेल्या ‘पनामा’ कालव्याविषयी वाचू या. आपण एरवी ज्या सहजतेने ‘अमेरिका’ म्हणतो तो देश म्हणजे उत्तर अमेरिका खंडामधला ‘युनायटेड स्टेट्स’ पिंवा ‘यूएस.’ प्रत्यक्षात पूर्वेला अॅटलॅन्टिक आणि पश्चिमेला पॅसिफिक महासागर असलेल्या दोन दक्षिणोत्तर विशाल भूभागांना ‘अमेरिका’ असं नाव आहे आणि त्यात पॅनडापासून ते अर्जेन्टिनापर्यंत अनेक देशांचा समावेश होतो. ‘यूएस’ त्यातलाच एक देश.

यातीलच पनामा या देशात ‘पनामा’ कालवा आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडांचा हा जोडबिंदू अगदी चिंचोळा भूभाग होता. अवघ्या 82 किलोमीटरचा. तो खणला तर पॅसिफिक आणि अॅटलॅन्टिक महासागरांचा कृत्रिम ‘संगम’ घडवून आणणं शक्य होतं. त्यामुळे सुएझ कालव्याने जसा दक्षिण आफ्रिकेच्या टोकापर्यंतचा जहाजांचा फेरफटका वाचवला तसाच दक्षिण अमेरिकेच्या टोकापर्यंतचा हजारो किलोमीटरचा प्रवास टाळून जहाजे अवघ्या काही तासांत अॅटलॅन्टिक-पॅसिफिक प्रवास करू शकणार होती. पैसा, श्रम, वेळ हे सारंच त्यामुळे वाचणार होतं. नाहीतर दक्षिण अमेरिकेच्या टोकाला मॅजेलॅन सामुद्रधुनीपर्यंत (ड्रेक पॅसेज) जायचं म्हणजे दक्षिण-धुवीय तीव्र वारे, वादळ, हिमवर्षावाचा सामना करावा लागायचा.

उपाय ‘नामी’ होता, पण प्रत्यक्षात कसा आणायचा? त्यासाठी कोलंबिया, फ्रान्स आणि यूएस एकत्र आले. सुएझचा अनुभव असलेल्या फ्रेंचांना कालवा खणण्याचं पंत्राट 1881 मध्ये देण्यात आलं. ते काम पुरेशा पैशांअभावी थोडय़ाच काळात बंद पडलं. पुढे ते इतपं रखडलं की, 1904 पर्यंत त्यावर कोणी विचारच केला नाही. त्यानंतर ‘यूएस’ने हा प्रकल्प हाती घेतला. मग मात्र दहा वर्षांत वेगाने काम झालं आणि 1914 मध्ये ‘पनामा’ कालवा हे जगातलं तंत्रज्ञानात्मक आश्चर्य जन्माला आलं. यात आश्चर्य कोणतं ते आता पाहू या.

वास्तविक मोठी म्हणजे हजारो टन मालवाहतूक करणारी जहाजं या समुद्रातून त्या समुद्रात जाण्याइतकी कालव्याची खोली (डेप्थ) असती तर त्यात आश्चर्यकारक काहीच वाटलं नसतं, परंतु त्यासाठी पनामाच्या त्या कठीण खडकाळ भागात खूप खोल खणणं सोपं नसल्याने त्या काळातील तंत्रज्ञांनी नवी ‘युक्ती’ शोधून काढली. खोल पाण्याशिवाय जहाजं तर पुढे सरकणं कठीण होतं. त्यासाठी कालव्याच्या पाण्याची पातळी कृत्रिमरीत्या वाढवून आणि कमी करून महाकाय जहाजं ‘उचलण्या’चा अद्वितीय प्रयोग यशस्वी करण्यात आला.

त्यासाठी ‘लॉपिंग सिस्टिम’ गरजेची होती. ज्या ठिकाणापर्यंत खोल सागरजल आहे, तिथपर्यंत जहाजं व्यवस्थित येतच होती. ती पुरेशी आत आल्यावर तिथे असलेले दरवाजे (लॉक) बंद केले जातात. पुढे खोल पाणी नसल्याने अरुंद जलपट्टय़ातून जहाजं हळूहळू पलीकडच्या समुद्रात जाण्यासाठी पाण्याची पातळी वाढवली जाते. त्यासाठी समुद्रसपाटीपासून 85 फूट उंचीवर असलेल्या गॅटन सरोवराचं पाणी या कालव्यात सोडलं जातं. पाण्याची पातळी वाढताच जहाजं आपोआप ‘वर’ जातात. त्याचा कालवा ओलांडण्यापर्यंतचा 82 किलोमीटर अंतरावर असे तीन ‘अप’ आणि तीन ‘डाऊन’ लॉक उघडबंद करून पाणी भरलं आणि काढलं की, बोट पुन्हा विरुद्ध बाजूच्या समुद्रात स्थिरावते. अशा तीन ‘लेन’ (मार्गिकां) मधून वाहतूक सुरू राहते. याचे व्हिडीओ आता यूटय़ूबवर उपलब्ध आहेत ते जरूर पहा. पाण्याच्या स्रोतांचा असा वापर जगात अन्यत्र केलेला नाही. अर्थात याला लागणारी ऊर्जा, देखभाल आणि सुयोग्य तंत्रज्ञान यांची क्षणोक्षणी काळजी घ्यावी लागते. आज हा कालवा प्रेक्षणीय स्थळ झालेला आहे. यात सुएझसारख्या बोटी ‘अडकण्या’च्या घटना घडत नाहीत. कारण ‘लॉक’ उघडल्यानंतरच बोट आत प्रवेश करते. सुएझ कालव्याचे शिल्पकार फर्निनान्द लेसेप्स यांनाच या कालव्याच्या संकल्पनेचे जनक मानलं जातं. कालव्यातली वाहतूक वर्षाकाठी किमान पंचवीस-तीस हजार जहाजांची असते. जास्त जहाजे जाणं कठीण. कारण एकेका जहाजाला कालवा पार करायला सुमारे साडेअकरा तास लागतात. आता हा कालवा पनामा देशाच्या मालकीचा आहे. त्यामुळे त्यातील महसूल त्यांना अधिक मिळणं स्वाभाविक आहे. 2021 मध्ये दुष्काळात गॅटन सरोवरातलं पाणी कमी झाल्याने लॉपिंग अनलॉपिंगला पुरेसा जलसाठा मिळेना. म्हणून जहाजांच्या संख्येवर मर्यादा आली. माणसाने ‘आश्चर्य’ घडवलं तरी निसर्गाचे ‘विस्मय’ त्याहून भारी असतात.