देवभूमीवर नवे संकट; आगीमुळे मोठे जंगल नष्ट, उष्णतेने हिमखंड वितळण्याचा धोका

गेले काही महिने उत्तराखंडच्या पर्वतीय भागांतील जंगलात धुमसणाऱया आगीत 1,107 हेक्टर जंगल नष्ट झाले आहे. देवभूमीतील निसर्गसंपदेचा ऱहास करणाऱया या आगीच्या लोटांमुळे निर्माण झालेले कार्बनचे आणि धुराचे ढग व उष्णतेने हिमखंड वितळू शकतात, असा इशारा पर्यावरण तज्ञांनी दिला आहे.

देवभूमीवरील या नव्या संकटाने येथील पर्यावरण धोक्यात आले आहे. नोव्हेंबरपासूनच वणवा पेटण्याच्या 886 घटना घडल्या आहेत. या अग्निकल्लोळात जंगलांचा मोठा प्रदेश नष्ट झाला आहे. पाळीव गुरांना चारा मिळण्यासाठी या आगी मुद्दाम लावण्यात येतात, असे काहींचे म्हणणे आहे. आतापर्यंत या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 61 जणांवर मुद्दाम जाळपोळ केल्याचा आरोप आहे.

आगी कुठे लागल्या

 उत्तराखंडमध्ये 47 ठिकाणी नव्याने जंगलांमध्ये आगी लागल्या होत्या. त्यात 78 हेक्टर जंगल भाग जळून खाक झाला. कुमाऊँमध्ये 51 हेक्टरवर 30 ठिकाणी आग लागली, तर गढवालमध्ये 25 हेक्टरवर 16 घटना घडल्या. संरक्षित जंगलांवर परिणाम झाला. या आगीच्या झळा नैनितालजवळ जाणवू लागल्यावर आगीचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफचे जवान पाठवण्यात आले होते. आग नियंत्रणासाठी काही जंगल भागांत सैन्यही सक्रिय झाले होते.

 

जागतिक हवामान संघटनेचा इशारा

 प्रदूषण, आगीसारख्या हानीकारक घटना यामुळे हिमालयातील ग्लेशियर वितळण्याचा वेग वाढत असल्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेनेही दिला आहे. ज्यामुळे हिमनग वितळणे, शिखर भागात पूर येणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढतो. हिमालयातील उंच भागात आपत्तींचे प्रमाण वाढते आहे, असे संघटनेने एका अहवालात म्हटले आहे.

 

जागतिक बँकेकडूनही चिंता व्यक्त

  जागतिक बँकेनेही अभ्यासात ग्लेशियर वितळण्याची गती वाढण्यामधील कार्बनची भूमिका अधोरेखित करत चिंता व्यक्त केली आहे. काळय़ा कार्बनच्या एकाच ठिकाणी वाढलेल्या प्रमाणामुळे सौर किरणोत्सर्गाचे शोषण वाढते, परंतु हवेचे तापमानदेखील वाढते. ज्यामुळे ग्लेशियर वितळण्याचा वेगही वाढतो, असे या अहवालात म्हटले आहे.