जय हो बाबा बर्फानी… 29 जूनपासून अमरनाथ यात्रा

 कश्मीरच्या अनंतनाग जिह्यातील अमरनाथच्या गुहेतून बाबा बर्फानींचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. बर्फाचे शिवलिंग सुमारे 8 फूट उंच आहे. 29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असून ती सुमारे 52 दिवस चालणार आहे. 29 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी ती पूर्ण होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली आहे. आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. 13 ते 70 वर्षे वयोगटातील हिंदुस्थानी अमरनाथ यात्रा करू शकतात.

अशी करा नोंदणी

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी तुम्ही श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगइन करू शकता. मोबाईल अॅपवरूनही नोंदणी करता येईल. त्यासाठी  श्री अमरनाथजी यात्रा अॅप डाऊनलोड करावे लागेल.

 कसे पोहोचायचे

यात्रेसाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे पहलगाम मार्गे जाता येते. या मार्गाने गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी 3 दिवस लागतात, परंतु हा मार्ग सोपा आहे. दुसरा बालटाल मार्ग आहे. जर वेळ कमी असेल तर तुम्ही बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी बालटाल मार्गाने जाऊ शकता. यात केवळ 14 किमी चढाई करावी लागते, परंतु ती खूप खडी आहे, त्यामुळे वृद्धांना या मार्गावर अडचण येते.