
शिवसेनेच्या पक्ष आणि धनुष्यबाण प्रकरणाची पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाने नवीन ‘तारीख’ दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाला पक्षाचे नाव व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला याचिकेतून आव्हान दिले आहे. या याचिकेवर मागील तीन वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात फैसला कधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवले गेले होते. त्यासंदर्भातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या याचिकेवरही पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणासोबत सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शिवसेनेची सुनावणी 21 आणि 22 जानेवारीला सलग दोन दिवस घेण्याचे निश्चित केले होते. मात्र गेल्या आठवड्यात तशी सुनावणी झाली नाही आणि खंडपीठाने नवीन तारीख जाहीर न करताच सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर न्यायालयाने शिवसेनेच्या सुनावणीसाठी 18 फेब्रुवारीची नवी ‘तारीख’ दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर ही तारीख नमूद केली आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतर ही सुनावणी होणार आहे.
























































