एकच मैदान, एकच पक्ष; शिवतीर्थावर खऱ्या शिवसेनेचाच दसरा मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकच मैदान, एकच पक्ष ही शिवसेनेच्या वैभवशाली आणि ऐतिहासिक दसरा मेळाव्याची परंपरा अखंड आहे. यंदाही दादर येथील शिवतीर्थावरच दसरा मेळावा होणार असून त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. दसरा मेळाव्यासाठी रीतसर परवानगी देणारे पत्र महापालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाकडून शिवसेनेला देण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे.

दरवर्षी दसऱयादिवशी होणारा शिवसेनेचा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोपऱयातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत असतात. या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी हा मेळावा होत आहे. त्यामुळे शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीला सुरुवातही करण्यात आली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय स्थितीवर काय भाष्य करतात, विरोधकांचा कसा समाचार घेतात, कुणावर आसुड ओढतात आणि कोणता नवा संदेश देतात याकडेही शिवसैनिकांचे लक्ष लागले असून शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

– शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी अधिकृतपणे परवानगी देणारे पत्र पालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी शिवसेना सचिव अनिल देसाई यांना दिले आहे.

अशा राहणार अटी – शर्ती

– दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी 500 रुपयांच्या शुल्कासह 20 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालनही करावे लागणार असल्याचे परवानगीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

– शिवाय मुख्य अग्निशमन अधिकाऱयांचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र, स्ट्रक्चरल इंजिनीअरचे स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मेळाव्यासाठी रात्री 10 वाजेपर्यंत वेळ राहणार असून पालिकेच्या अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे.