
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगाव सज्ज झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा स्वागतयात्रेचे आयोजन केले आहे. भव्यदिव्य चित्ररथ, दिग्गज कलाकारांची उपस्थिती, पारंपरिक वेशभूषेतील नागरिक हे स्वागतयात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नववर्ष स्वागतयात्रा 22 मार्चला गिरगाव नाक्यावरून सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. एकवीरा देवीची 22 फुटी भव्य प्रतिमा हे सोहळय़ाचे खास आकर्षण असणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा रथात ठेवण्यात येणार आहे. शेअर बाजाराचे महत्त्व ठसवणारा चित्ररथदेखील असणार आहे. स्वागतयात्रे दरम्यान दक्षिण मुंबईतील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे तसेच शिक्षणसंस्था आदींची माहिती देणारे फलक जागोजागी लावण्यात येणार आहेत. याशिवाय दक्षिण मुंबईत वास्तव्यास असलेले स्वातंत्र्यसैनिक, मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट, दक्षिण मुंबईतील कलाकार आदींचे दर्शन घडवणारे चित्ररथदेखील यामध्ये समाविष्ट असतील.
नागराज मंजुळे, आकाश ठोसर यांचा सहभाग
‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातील नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, महेश पटेल यांचाही स्वागतयात्रेत सहभाग असणार आहे. याशिवाय कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव- खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी, राजकुमार बाफना आणि अरुण दुधवडकर तसेच महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन या यात्रेसाठी लाभले आहे.
दक्षिण मुंबईत मिशन स्वच्छता
नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त शिवसेनेच्या वतीने 18 मार्चला दक्षिण मुंबईत स्वच्छता मिशन हाती घेतले आहे. यासाठी विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या नव्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱयांची फळी सज्ज झाली आहे. या मिशननुसार दक्षिण मुंबईतील प्रत्येक गल्ली, इमारत आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत.