
कोरोना काळात मुंबई मॉडेलचे अख्ख्या जगात कौतुक झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत आले. या सगळ्यांची यांना पोटदुखी आहे आणि म्हणूनच भ्रष्टाचार भ्रष्टाचार बोंबलून मुंबईला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्याने अजिबात डगमगून जाण्याचे कारण नाही. यांच्या पोटदुखीसाठी येणाऱ्या निवडणुकीत जमालगोटा द्यावाच लागेल. हे जे घोडय़ाचे औषध आहे ते द्यावेच लागेल. कोटा एकदाच व्यवस्थित साफ करावा लागेल, असे सांगतानाच तुमच्यात हिंमत असेल तर ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर पालिकेची चौकशी करा, पीएम केअर फंडाचा हिशेब द्या, असे उघड आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
दादर येथील शिवाजी मंदिर येथे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखाप्रमुख, नगरसेवक आणि विभागप्रमुखांशी संवाद साधला. तुडुंब भरलेल्या सभागृहाच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्यांच्या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराच्या चिंधडय़ा उडवल्या.
जळणाऱ्यांची मी पर्वा करत नाही
मी मला कोणतेच श्रेय घेत नाही. पण कोविड काळात देशात सातत्याने जे सर्व्हे झाले त्यामध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. ही यांची पोटदुखी आहे. भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचे नाव त्या यादीत आले नव्हते ही पोटदुखी त्यांना झाली आहे. या पोटदुखीसाठी येणाऱ्या निवडणुकीत जमालगोटा द्यावाच लागेल. हे घोडय़ाचे औषध देऊन एकदाच कोटा व्यवस्थित साफ करावा लागेल, असे आवाहन करत कोविड काळाचा दाखला उद्धव ठाकरे यांनी दिला. कोविडमध्ये मुंबई-महाराष्ट्रात जे काम झाले त्याचे तुम्ही सगळेच साक्षीदार आहात. मी आजही जिथे जातो, अगदी परदेशातही जे लोक भेटतात ते साहेब, तुमच्यामुळे आम्ही वाचलो, आमचे आप्त वाचले असे सांगतात. महाराष्ट्राबाहेरील लोकांचीही हीच भावना आहे. उद्धवजी, तुमच्यासोबत हे जे वागलेत ते आम्हाला मान्य नाही. आम्ही महाराष्ट्रात नसलो तरी तुमच्यासोबत आहोत, आमचे आशीर्वाद तुमच्यामागे आहेत. जळणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे असे कित्येक हात माझ्यामागे आहेत, हीच माझी कमाई आहे, अशा भावनाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
चौकशीला आम्ही घाबरत नाही
कोविड काळातील मुंबई महापालिकेच्या कारभाराची जरूर चौकशी करा. आम्ही घाबरत नाही, असे उघड आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यावेळी एपिडेमिक ऍक्ट होता. पंतप्रधानांनी डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टही आणला होता. त्याचा अर्थच असा की, जेव्हा अशी आणीबाणीजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा नियमांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला लोकांचे जीव वाचवण्याला प्राथमिकता द्यावी लागते आणि तेच काम आपण केले. असं असूनही चौकशी करायचीच असेल तर ठाणे पालिकेची चौकशी करा. तुमच्याच आमदाराने संजय केळकरने ही चौकशीची मागणी केली आहे. ती चौकशी तुम्ही का करत नाही, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत तेव्हा भाजपचा स्टँडिंग कमिटी चेअरमन रंगेहाथ पकडला गेला होता. त्याला जाब विचारा. पुणे, नागपूर पालिकेची चौकशी करा. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्याच राज्यांच्या तेव्हाच्या कारभाराची चौकशी करा. हिंमत आहे का तुमच्यात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ललकारले.
पीएम केअर फंडाचे पैसे कुठे गेले?
पीएम केअर फंडाचे काय… करा त्याचीही चौकशी. पीएम केअर फंडात टाटांनीच एकरकमी दीड हजार कोटी रुपये दिले होते. आणखीही लाखो करोडो रुपये जमा झाले ते कुठे गेले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला ते आमची चौकशी काय करणार? तुम्ही खोकेबहाद्दर. सुरत-गुवाहाटीमार्गे गोव्याला पोहचलात. तेव्हा जो हॉटेल आणि फ्लाइटला खर्च झाला त्याचा हिशेब तुम्ही का देत नाही? पीएम केअर फंड चौकशीच्या कक्षेत येत नाही मग पीएम केअर फंडचा अर्थ आम्ही हास्यजत्रेतला प्रभाकर मोरे केअर फंड असा काढायचा का. नाव बदलून टाका त्याचे. कशाला दिले लोकांनी पैसे. आमच्या इथल्या सगळ्या दलालांनी आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा तेव्हा महाराष्ट्रात पैसे न देता पीएम केअर फंडात पैसे दिले. मग हे सगळे पैसे कुठे गेले असा प्रश्न आम्ही करायचा नाही का. तेव्हा बिघडलेले व्हेंटिलेटर्स आम्हाला दिले गेले. हे कोणाचे पाप होते, असा सवाल करताना तुम्ही आमची चौकशी करणार असाल तर आम्हीसुद्धा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
मेहबूबांसोबत मैत्री; भाजपचे बिंग फुटले
पाटण्यात बैठकीसाठी गेलो होतो. तिकडे मुद्दाम मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसलो. ते पाहून देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून बोंबलत सुटले. आता मिरच्या का झोंबल्या तुम्हाला? आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता मग मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर सत्तेत बसला होतात तेव्हा तुमचं सुटलं नव्हतं का… मला हिंदुत्व सुटलं नव्हतं का म्हणायचं आहे. उगाच कुणाचा गैरसमज नको, असे नमूद करत हिंदुत्व आम्ही सोडलं नाही आणि सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. मेहबूबा यांच्यासोबत माझे बोलणे झाले. ते निर्लज्ज आहेत. ते तुमच्यासोबत आले, पण तुम्ही कशा काय त्यांच्यासोबत गेलात असे मी त्यांना विचारले. तेव्हा 370 वगैरे सगळ्याला स्टेटस्को म्हटल्याने मी पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून शेम शेम असा आवाज गर्दीतून उठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतचे फोटो झळकावत तसेच नवाज शरीफ यांच्यासोबतचा मोदींचा फोटो दाखवत भाजपच्या असल्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा आम्ही फाडणारच, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दीत स्वतः चोरी करायची आणि स्वतःच चोर चोर म्हणून बोंबलायचं म्हणजे चोराला सोडून लोक दुसऱ्याच्या मागे लागतात. मग चोर पसार होतो. तसंच आज भाजपचं झालं आहे. स्वतः ढीगभर घोटाळे करून ठेवले आहेत आणि ते एकेक बाहेर येऊ लागल्याने ते भ्रष्टाचाराच्या नावाने बोंबलत सुटले आहेत.
कुठेही डगमगू नका. कदाचित नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेतील. एक मोठं षड्यंत्र रचलं जात आहे. आपल्याला बदनाम केले जात आहे. अरे बापरे, एवढा पैसा म्हणून ओरड केली जात आहे. एवढा पैसाच काय एक पैसाही इकडे तिकडे गेलेला नाही. एक नवा पैसा आपल्या घरात आलेला नाही. त्यांना हवं तितकं बोंबलू द्या. देशातील सगळ्याच कारभाराचा आढावा घेणार असतील तर महाराष्ट्राच्या तेव्हाच्या कारभारावरही मी बोलायला तयार आहे. जिकडे बोलायचे तिकडे मी बोलेन.
मिंध्यांची शेपूट इतकी आत गेलीय की…
निर्लज्जम सदा सुखी असेच मिधेंना म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल यांच्या मनात इतकं विष भरलेलं आहे की, यांनी ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली. त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तिथे साहेबांचा फोटो होता तरीही हातोडा मारला. असा एक तरी हातोडा तुम्ही भाजप नेत्यांच्या फोटोवरती किंवा त्यांच्या कार्यालयांवरती मारण्याची हिंमत दाखवणार आहात का, असा सवाल करताना तुमची शेपूट इतकी आत गेलीय की, सीबीआयलाही ती शोधता येणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
विखेंवर धाडी टाकणार का?
तुमच्या मंत्र्यांची प्रकरणे रोज बाहेर येत आहेत. संजय राऊत यांनी राहुल कुल यांचा घोटाळा काढला. तक्रारही केली. विक्रांत घोटाळा बाहेर आला. सत्तारांची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर झाकीर नाईककडून पैसे घेतल्याची कबुली दिली. आमच्या ट्रस्टने चार कोटी नाही, अडीच कोटी घेतले असे ते म्हणाले. हा नाईक देशद्रोही आहे. मग ज्या कलमांखाली तुम्ही नवाब मलिक यांना आत टाकलं, ती कलमे विखेंना का लावली जात नाहीत? विखेंवर धाडी टाकायची हिंमत भाजपवाल्यांमध्ये आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मांडवीय बोलले आणि फडणवीसांची पंचाईत झाली!
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय मुंबईत आले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच माझे कौतुक केले. त्यामुळे त्यांची पंचाईत झाली, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपशासित राज्यांमधील गोंधळी कारभाराचा समाचार घेतला. मांडवीय यांच्या खात्याने तेव्हा रेमडेसिवीर कोणाला किती दिली? महाराष्ट्राला किती दिली? भाजपशासित राज्याला किती दिली? उघड किती दिली आणि गुपचूप किती दिली. ऑक्सिजनच्या बाबतीत कसे वागले, या सगळ्याचा हिशेब मागावाच लागणार आहे. अवघ्या पंधरा-सोळा दिवसांत कोविड फिल्ड हॉस्पिटल बांधणारं महाराष्ट्र हे तेव्हा एकमेव राज्य होते. हा दोनशे-पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास नाही. काल-परवाची गोष्ट आहे. यांचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये चिता पेटल्या होत्या. प्रेतं गंगेत सोडून दिली जात होती तेव्हा महाराष्ट्रात एकासुद्धा मृतदेहाची विटंबना, अवहेलना आम्ही होऊ दिली नाही. तरीही निर्लज्जानो आमच्यावर आरोप करताय. मोदींनी लस शोधली म्हणताय. मोदींनी काय केलं? थाळ्या वाजवायला, घंटा बडवायला सांगितलं. कोलांटउडय़ा, बेडूक उडय़ा मारायला सांगितलं. दुसरं काय केलं? गो करोना गो म्हणून कोरोना पळून गेला का, असा बोचरा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
जशास तशापेक्षाही जास्त कडक उत्तर मिळेल
येत्या 1 तारखेचा मोर्चा आपण कुणाला निवेदन देण्यासाठी काढत नाही. ज्यांना निवेदन द्यायचे असते ते जर का त्यांच्या टेबलाखाली बसले असतील तर त्यांना निवेदन कशासाठी द्यायचे, असा सवाल करत, जे काही सगळं सध्या वातावरण आहे त्याविरुद्ध हा मोर्चा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शनिवारी पाऊस येण्याची शक्यता आहे. तरीही तुम्हाला तुमची ताकद दाखवावीच लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर सभागृहातून एकच नारा घुमला. आज ज्या काही यंत्रणा वापरल्या जात आहेत त्यांना मला सांगायचे आहे, तेव्हा तुमच्या मायबापांनासुद्धा आम्हीच वाचवले होते. अनेक पोलीस असतील, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीवाले असतील त्यांचे आईवडील, बंधूजन येथे राहतात त्या सगळय़ांनाच वाचवण्याचे काम आमच्या सरकारने, पालिकेने केले होते. याचा विसर पडू देऊ नका. हे पारडे आता फिरलेच पाहिजे. यांचे शंभर अपराध आता भरत आले आहेत. ते जसं आमच्याशी वागताहेत त्याची खूणगाठ बांधून ठेवा. यांना अजिबात सोडायचे नाही. तुम्ही मजबुतीने माझ्यासोबत असाल तर मी कुणालाही घाबरत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा जशास तशापेक्षाही जास्त कडक उत्तर आपण द्यायचे आहे, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
पोलिसांनो, राजकीय पक्षांचे नोकर बनू नका!
तुमच्यापैकी काही जणांना अजूनही फोन येत असतील. काही जणांना पोलीस बोलवताहेत. एका पोलीस अधिकाऱ्याचे नावसुद्धा मला कळले आहे. त्याला मी जो काही निरोप द्यायचा तो दिला आहे, असे सांगताना पोलिसांना माझे सांगणे आहे. ते जनतेची चाकरी करत आहेत. राजकीय पक्षाचे नोकर म्हणून त्यांनी वावरू नये. इकडे जातोस का वगैरे प्रेमाचे निरोप देण्याचे त्यांचे काम नाही. असले निरोप माझ्या शिवसैनिकांना देऊ नका. हे सगळे शिवसैनिक माझे प्रेमाचे आहेत. सगळे माझ्यावरती प्रेम करतात आणि मी त्यांच्यावरती प्रेम करतो. आमचं प्रेम पिढीजात आहे. अगदी घराणेशाहीचं प्रेम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. एका नगरसेवकाचा उद्धव ठाकरे यांनी दाखला दिला. आम्ही भीक मागू पण उद्धव साहेब आम्ही शिवसेना सोडणार नाही, असे या नगरसेवकाने फोन करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. तुम्हाला अशी भीक मागायची गरज नाही. तुमच्या कर्तृत्वाने आणि जनतेच्या विश्वासाने तुम्ही येथवर आला आहात. त्यांच्याकडे खोके असतील, पण जनतेची धनदौलत आपल्यासोबत आहे हे नेहमी ध्यानात ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. आपल्यात अजूनही कुणी बाजारबुणगे असतील, येथे राहून त्यांच्या चाकऱ्या करत असतील तर त्यांनी इकडे थांबू नये, असेही ते म्हणाले.
शिवसैनिकांच्या मेळाव्यात व्यासपीठावर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, मीना कांबळी, युवासेना सचिव सूरज चव्हाण, आदेश बांदेकर, पराग डाके आदी मान्यवर उपस्थित होते.
देश आज केवळ आणि केवळ देशावरती असलेल्या संस्कारांमुळे चालला आहे. देशवासीयांच्या संयमामुळे चालला आहे. नाहीतर भाजपच्या हातून देश कधीच सुटलेला आहे. कारभार म्हणून शून्य आहेत आणि मग आपण उघडे पडणार म्हणून उद्धव ठाकरे यांना खलनायक करण्याचे कारस्थान रचत आहेत. मी नायक आहे की खलनायक हे जनता ठरवेल, पण एक निश्चित ते म्हणजे तुम्ही नालायक आहात हे मात्र जनतेला पक्के माहीत झालंय.
संपूर्ण देशामध्ये आज तुम्ही हुकूमशहा म्हणून उभे राहत आहात. सैतानाचे हे रूप आमच्यासमोर असताना आम्हाला या सैतानाला आधी गाडावेच लागेल. खतम करावेच लागेल.
भिकेला लागलेला एक उपरा दलाल माझ्या महाराष्ट्रात, माझ्या मुंबईत येऊन मराठी माणसांवरती दादागिरी करतो आहे. त्याने तक्रार केल्यानंतर माझ्या सोन्यासारख्या मुंबईची अब्रू काढली जात आहे. तुमच्यासाठी ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असेलही, पण आमच्यासाठी ही मायमाऊली आहे. मुंबाआई आहे. या उपऱ्यांपासून आपल्या आईचे मुंबईचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे.
भाडोत्री जनता पक्ष!
सगळी इकडची तिकडची सोंगं गोळा करून भाजपवाले पक्ष चालवत आहेत. जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणतात आणि या पक्षात जे जुने जाणते आहेत, ज्यांनी भाजप कधीतरी सत्तेत येईल म्हणून कष्ट उपसले आहेत त्यांच्यावर आज उपऱ्यांची भांडी घासायची वेळ आणली आहे. भाजप सत्तेत आल्यावर सगळे उपरे निष्ठावंतांच्या डोक्यावरती बसवले गेलेत. भारतीय जनता पक्ष आज भाडोत्री जनता पक्ष झाला आहे. भ्रष्ट जनता पक्ष झाला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
मी नुसता बोललो तरी नड्डा सुटतो…
मोदी अमेरिकेत गेलेत. तिकडे त्यांच्यासमोर निदर्शने झाली. बराक ओबामाही त्यांच्याबद्दल बोलले. आता कुठे गेलं तुमचं ते माय फ्रेंड बराक ओबामा… आता बराक बराच बोलला त्याचे काय. त्यालाही तुम्ही तुमच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट रचला असेल म्हणाल. मोदी विरुद्ध जग असे चित्र उभे कराल. मला तुमची टर्र खेचायची नाही. तुम्ही जे उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप चालवलं आहे त्यावर मला बोलायचे आहे. ना माझ्याकडे पक्षाचे नाव आहे ना चिन्ह आहे तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते आहे. काल नड्डा ओडिशात गेले आणि तिकडेही माझ्यावर बोलले. म्हणजे मी नुसता बोललो तरी यांचा नड्डा सुटतो… नड्डा म्हणजे बोलायला सुटतो, माणूस बोलत सुटतो, असे मला म्हणायचे आहे. उगाच वेगळा अर्थ काढू नका (हशा), अशी फटकेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली.
कोरोनाची लाट असताना मध्य प्रदेशातील सरकार पाडून स्वतःचे सरकार आणणारे हे निर्घृण विकृत लोक आहेत. ही विकृत माणसं आज आपल्या अंगावरती येत आहेत. यांना आपण पुरून उरणार आहोत. पुरून म्हणजे त्यांना पुरून उरणार!
देवेंद्रजी, आमच्या घरापर्यंत येऊ नका
मी पाटण्यात गेलो तर देवेंद्र फडणवीस लगेच म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेले. देवेंद्रजी, एवढय़ा पातळीवरती येऊ नका. परिवार तुम्हालादेखील आहे. तुमच्यासुद्धा परिवाराचे व्हॉट्सऍप बाहेर येत आहेत, आले आहेत. आम्ही अजून त्यावरती बोललेलो नाही. जर आम्ही तुमच्या परिवारावरती बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल. वेगळी कोणतीही आसने तुम्हाला झेपणार नाहीत. नुसतं शवासन करून पडून राहावं लागेल. म्हणून तुम्हाला आजच सांगतोय, परिवारावरती बोलू नका. तुम्ही तुमचं घर सांभाळा. आमच्या घरापर्यंत येऊ नका. नाहीतर आम्हाला तुमच्या घरात जावं लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. सूरजच्या घरी तुम्ही धाड टाकली. तो माझा शिवसैनिक आहे. माझ्या परिवारतला आहे. सगळे शिवसैनिक हा माझा परिवार आहे. माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडत आहे. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत मी संवेदनशील आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.



























































