पाचोर्‍यात गद्दारांविरोधात शंखनाद, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी जाहीर सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थळ : अटल मैदान
वेळ : सायंकाळी 5.00 वाजता

खान्देशात रविवारी गद्दारांच्या विरोधात शंखनाद होणार आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जंगी जाहीर सभा होणार आहे. अटल मैदानावर होणार्‍या या सभेत उद्धव ठाकरे गद्दार गँगची कशी लक्तरे काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टोलेजंग जाहीर सभा झाली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांच्या मिंधेपणाची चांगलीच पिसे काढली होती. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवार, 23 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांची जंगी जाहीर सभा होत आहे. पाचोर्‍यातील अटल मैदानावर होणार्‍या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकार्‍यांनी सभेनिमित्ताने संपूर्ण खान्देश पिंजून काढला आहे. आतापर्यंतच्या सर्व सभांमध्ये झालेले गर्दीचे विक्रम ही सभा मोडीत काढणार असल्याचे बोलले जात आहे.

पाचोर्‍यात होणार्‍या जाहीर सभेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे, ‘निर्मल सीड्स’च्या संचालिका वैशाली सूर्यवंशी पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, दीपक राजपूत, प्रा. समाधान महाजन, महिला आघाडीच्या महानंदा पाटील यांच्यासह जळगाव तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.

असा आहे दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी दुपारी 12.30 वाजता जळगाव येथे आगमन होणार असून, विमानतळावरून ते लगेच पाचोर्‍याकडे रवाना होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी वरखेडी नाका ते महाराणा प्रताप चौकापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. कोरोनाकाळात कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेची काळजी घेतली. त्याची अवघ्या जगाने दखल घेतली. त्याबद्दल महाराणा प्रताप चौकात पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 3.30 वाजता निर्मल सीड्स येथे प्रयोगशाळेचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर लगेचच स्व.आर.ओ. (तात्या) पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. उद्धव ठाकरे हे सायंकाळी जयकिरण धामला भेट देणार असून त्यानंतर त्यांचे सभास्थळी आगमन होणार आहे.