गुजरात मजबूत करायला महाराष्ट्राला का ओरबाडता? उद्धव ठाकरे यांचा खणखणीत सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योग गुजरातला नेल्यानंतर आता पंतप्रधान मोदी म्हणतात, गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा. मग महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही काय? देश मजबूत करण्यासाठी इतर दुसरी राज्येच नाहीत का? गुजरातला जरूर मजबूत करा पण त्यासाठी महाराष्ट्राला का ओरबाडता, असा खणखणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मीरा-भाईंदर येथील यादव समाज संघाच्या मेळाव्यात राममंदिर लोकार्पण सोहळा, मराठी-उत्तर भारतीय वाद आणि भाजपची हुकूमशाही याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये मिठाचा खडा घालणाऱयांपासून सावध रहा, असा इशाराही त्यांनी दिला.

मीरा-भाईंदर येथील यादव समाज सेवा संस्थेतर्फे गोवर्धन पूजा समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सेव्हन स्क्वेअर येथील एमबीएमसी मैदानात झालेल्या या कार्यक्रमात हजारो हिंदी भाषिक बांधवांनी उद्धव ठाकरे यांचे प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. गोवर्धनाची पूजा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदी भाषिकांच्या नात्याचा गौरव केला.

मराठी-उत्तर भारतीयांमध्ये मिठाचा खडा कोण टाकतंय?

मराठी माणूस आणि उत्तर भारतीय हे दूध साखरेसारखे मिसळून गेले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे ना असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच ‘होय नक्कीच… शिवसेना झिंदाबाद’ असा गजर हिंदी भाषिक बांधवांनी केला, पण मग या दूध साखरेत मिठाचा खडा कोण टाकतंय? त्यांच्यापासून सावध राहा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. निवडणुकीच्या वेळी तुमच्या गावातून कोणीतरी पलीकडच्या पार्टीचा माणूस येतो. तो तुम्हाला भेटतो, तुमच्यात बसतो, तुमचा ब्रेन वॉश करतो. एकदा निवडणूक झाली, पाच वाजून गेले की तो गावातून येणारा माणूस गायब होतो. उरतो फक्त तुम्ही आणि आम्ही. हा मिठाचा खडा टाकणाऱयांना ठणकावून सांगा तुमची गरज नाही. आम्ही महाराष्ट्रात-मुंबईत सुखी आहोत. कोणतेही संकट असो, नैसर्गिक आपत्ती असो, दंगे असो की अपघात असो, तुमच्यासाठी पहिली धावून येते ती शिवसेना आणि प्राणांची पर्वा न करणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक. समोरच्याला संकटातून वाचवणे हेच आमचे हिंदुत्व आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये डायमंड बोर्सचे उद्घाटन करताना गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल असे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांनी त्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, मुंबई महाराष्ट्रातील सगळे उद्योग त्यांनी हुकूमशाही वृत्तीने गुजरातला पळवले. इथे वर्षानुवर्षे राहून इथलेच झालेले उत्तर भारतीय आता गुजरातला जाणार आहेत काय? इथले गुजराती बांधव महाराष्ट्रातला उद्योग सोडून पुन्हा सुरतला जाणार आहेत काय? गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल असे पंतप्रधान म्हणतात मग महाराष्ट्र, यूपी मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का? देशाला मजबूत करणारे इतर दुसरे कोणतेही राज्य नाहीत का? गुजरात जरूर मजबूत करा. त्याचा आम्हाला खेद नाही, पण मग त्यासाठी महाराष्ट्राला का ओरबाडता, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

जय श्री कृष्ण, जय श्री राम म्हणा आणि हुकूमशाही खतम करा

कालपर्यंत ज्यांना आपले मानले, ज्यांना आपले समजले ते दुश्मन बनून समोर उभे ठाकले आहेत. त्यांनी तर आपला धनुष्यबाणही चोरला. हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदूंवरच हुकूमशाही सुरू आहे. सत्तेचा आधार घेऊन ही तानाशाही सुरू आहे. भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, धर्माच्या विरोधात जो हत्यार उचलेल त्याचे निर्दालन करावेच लागेल. भगवान श्री कृष्ण मी तुमच्यात, जनता जनार्दनात पाहतोय. जय श्री कृष्ण, जय श्री राम म्हणा आणि ही हुकूमशाही खतम करा असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

कोरोना काळात उद्धवजींनीच महाराष्ट्र वाचवला

या कार्यक्रमात हिंदी भाषिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात मुंबई-महाराष्ट्रात राहणाऱया उत्तर भारतीय जनतेची घेतलेल्या अपार काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोविड काळात मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धवजींनी मुंबई महाराष्ट्रात राहणाऱया उत्तर भारतीयांना अन्न दिले, औषधे पुरवली, गावाला जाणाऱया माणसांसाठी बस-रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली. पालकांसारखी काळजी घेतली. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने महाराष्ट्राचा गौरव केला. कोविड काळात धारावी मॉडेलचे कौतुक झाले. नंबर वन मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला. उद्धवजी आमच्या हृदयात आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा विराजमान होवो अशी भावना यावेळी हिंदी भाषिक नेत्यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना नेते, खासदार राजन विचारे, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, लक्ष्मण जंगम, ओवळा माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, यादव समाज सेवा संस्थेचे कार्यकारिणी अध्यक्ष रंगबहादूर यादव, अध्यक्ष उमेश यादव, सचिव आर. बी. यादव, सचिन यादव, चंद्रभान यादव, वीरेंद्र यादव, फुलचंद यादव, डॉ. दुर्गेश यादव यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

1992-93च्या दंगलीत शिवसेनेने मुंबईतील हिंदूंना वाचवले होते. त्या काळात हिंदू आहोत हे सांगायला लोक घाबरत होते. भाजपची तर गोष्टच सोडा. तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने प्राणाची पर्वा न करता शिवसैनिक रस्त्यावर उतरले. जे देशद्रोही आपल्यावर चालून आले शिवसेना त्यांच्यावर चालून गेली.

कोणीतरी म्हणाले आपले सरकार केंद्रात येईल. येईलच… आणि आणावेच लागेल. राजन विचारेंना केंद्रात मंत्री बनवा असेही तुम्ही म्हणालात. मी इतकेच म्हणेन आपके मूह में घी शक्कर. आजच्या श्री कृष्णाच्या पूजेतले लोणीही त्यात घाला.

रामलल्ला भाजपची प्रॉपर्टी आहे काय?

राम मंदिराचे निर्माण होत आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. प्रभू राम आणि श्री कृष्ण हे हिंदूंचे हजारो वर्षांचे मानबिंदू आहेत. युगानुयुगे आम्ही जय श्री कृष्ण, जय श्री रामच्या घोषणा देतो, पण मध्य प्रदेशात झालेल्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री तिथल्या मतदारांना म्हणाले, तुम्ही आम्हाला मत दिले तर तुम्हाला रामलल्लाचे फुकट दर्शन घडवू. मग भाजपला मत न देणाऱयांना रामलल्लाचे दर्शन घडवणार नाही का? फक्त मध्य प्रदेशातील लोकांनाच रामलल्लाचे फुकट दर्शन कशासाठी? महाराष्ट्रातील हिंदूंनी काय गुन्हा केला आहे? त्यांना रामलल्लाचे फुकट दर्शन का घडवत नाहीत? रामलल्ला ही भाजपची प्रॉपर्टी आहे काय? ते तर साऱया विश्वाचे आहेत असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.