कारशेडसाठी आरेचा आग्रह पुढे रेटू नका! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्य सरकारला आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘आरेत कारशेडसाठी एका रात्रीत शेकडो झाडांची कत्तल झाली होती. पर्यावरणाच्या रक्षणासाठी मी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच कारशेडला स्थगिती दिली होती. कांजूर मार्गची पर्यायी जागा ठरवण्यातही आमचा अहंकार नव्हता. मुंबईकरांच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो, कारशेडसाठी पुन्हा आरेचा आग्रह पुढे रेटू नका. माझा राग मुंबईवर काढू नका. माझ्या पाठीवर वार केलात तसा मुंबईच्या काळजात खंजीर खुपसू नका,’’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला केले. आपण मुंबईच्या विकासाच्या आड नाही, पण पर्यावरणाशी खेळू नका, असे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना, यापुढे आपण शिवसेना भवन येथे बसणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱयांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आरे कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

हीच आपल्या आयुष्याची कमाई आहे

शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या राज्यातील जनतेचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनापासून आभार मानले. गेल्या आठ-दहा दिवसांत आपल्याला अनेकांनी फोन केले. सोशल मीडियावरून त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या. एखाद्याने पद सोडल्यानंतर लोक रडतात असे क्वचितच होते असे सांगतानाच, हीच आपल्या आयुष्याची कमाई आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेच्या डोळय़ांतील या अश्रूंशी मी कधीच प्रतारणा करणार नाही. या अश्रूंशी कधीच गद्दारी, हरामखोरपणा करणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही

‘‘अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला ते पाठीवर वार करून पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असे म्हणत आहेत. पण एकनाथ शिंदे हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही,’’ असे स्पष्ट शब्दांत बजावत उद्धव ठाकरे यांनी नवीन सरकारबाबत जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर केला. मतदारांच्या मतांचा बाजार मांडला जात असेल तर ते घातक आहे असा संताप व्यक्त करताना लोकशाहीचे धिंडवडे थांबवा, असाही फटकार त्यांनी भाजपला लगावला.

लोकप्रतिनिधीला परत बोलवायचा अधिकार हवा

‘‘आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे, पण आपला लोकप्रतिनिधी गुप्तपणे कुठे फिरतोय त्याची माहितीच मतदाराला नसते. त्यामुळे लोकप्रतिनिधीला माघारी बोलवण्याचा अधिकार मतदाराला दिला गेला पाहिजे’’ अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. माहीमच्या मतदाराने टाकलेलं मत सुरत… गुवाहाटी… गोवा असे फिरायला लागले आणि ते मतदारालाच कळले नाही. तर देशात लोकशाही कुठे आहे, असा टोला त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला. लोकशाहीचे हे धिंडवडे थांबवा असे ते म्हणाले.

…म्हणजे सलग पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री नसेल

उद्धव ठाकरे यांनी यावेळी शब्द फिरवणाऱया अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘‘मातोश्री निवासस्थानी अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे सरकार शानदारपणे आले असते. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा किंवा भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. पहिला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर तो ठरलेल्या दिवशी पायउतार होईल असे लिहून दिले असते. अगदी त्या पत्राचे हार्ंडग करून मंत्रालयाच्या दारात लावा असेही भाजपला सांगितले होते. पण त्यानंतरही त्यांनी पाठीत सुरा खुपसला याचे दुःख होते. आता अडीच वर्षे झाली आहेत. म्हणजे पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री नसणार आहे.’’

माझं आणि शहांचं हेच तर ठरलं होतं

‘‘शिवसेना तुमच्यासोबत अधिकृतपणे होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हेच तर ठरलं होतं. मग मला कशाला मधेच मुख्यमंत्री होण्यास भाग पाडलात? ठरल्यानुसार जर सर्व घडले असते तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता,’’ असेही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र नाही!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला खाली उतरवून स्वतः मुख्यमंत्री होण्याचा अट्टहास करणाऱयांचे काय करायचे ते जनतेनेच ठरवावे असे सांगतानाच, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला ठणकावले.

कांजूरला कारशेड झाले तर मेट्रो अंबरनाथ-बदलापूरपर्यंत

मुंबईतले जवळपास 800 एकरचे जंगल राखीव केले गेल्याने आरेत पुढे जाण्याचा विचार केला तरी सरकारला जाता येणार नाही याचेही स्मरण उद्धव ठाकरे यांनी करून दिले. कांजूर मार्गची जमीन महाराष्ट्राचीच असून ती सरकारने महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कांजूरला कारशेड झाले तर मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल असेही ते म्हणाले.

तिथे झाडे तोडली असली तरी वन्यजीवन आहे

‘‘कारशेडसाठी ज्या ठिकाणी झाडे तोडली गेली तिथे मध्यंतरी एक बिबटय़ा फिरताना आढळला होता. म्हणजेच तिथे वन्यजीवन आहे. तिथे कारशेड झाली तर रहदारीच्या आवाजाने तेथील वन्यजीवनही धोक्यात येईल आणि मग तिथे काहीच नाही असे म्हणत तुम्ही पुढे-पुढे जाल,’’ अशी भीतीही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आरेमध्ये मेट्रो कारशेड नकोच, याचा पुनरुच्चार करतानाच मी पर्यावरणवादी आणि पर्यावरणासोबत आहे, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.