आज शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा!! उत्साह तोच, जल्लोषही तोच, पण खबरदारी आणि सावधगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - चंद्रकांत पालकर

आज दसरा, सीमोल्लंघनाचा दिवस. ‘चलो शिवतीर्थ’ असा नारा देत राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱयातून लाखो शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर दाखल होतात. दरवर्षी हेच चित्र असते.

यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे चित्र पाहायला मिळणार नसले तरी शिवसैनिकांचा उत्साह तोच आहे आणि जल्लोषही तसाच आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा आज खरोखरच ऐतिहासिक ठरणार आहे. शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे नाते कित्येक दशके कायम आहे. ते यापुढेही कायम राहावे यासाठीच यंदाचा मेळावा शिवतीर्थानजीकच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अवघ्या महाराष्ट्राला मार्गदर्शन करणार असून ते कोणता विचार देतात, राज्याच्या-देशाच्या राजकारणाला कोणती दिशा देतात याबद्दल सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्पृतिक परंपरेचा वारसा मानला जातो. दसरा मेळाव्यात शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात. त्यातूनच राज्याच्या, देशाच्या राजकारणाला, समाजकारणाला दिशा मिळते. कोरोना संकटामुळे यंदाचा मेळावा शिवतीर्थावर न होता नजीकच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अवघ्या महाराष्ट्राशी संवाद साधणार आहेत. राज्यातील आणि देशातील राजकीय सध्यस्थिती यावर ते नेमके काय भाष्य करतात, कोणता विचार मांडतात याबद्दल प्रसारमाध्यमांनाच नव्हे, तर राजकीय विश्लेषकांनाही कमालीची उत्सुकता आहे. या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण विविध वृत्तवाहिन्या आणि ट्विटर, फेसबुक व यू-टय़ूब या सोशल मीडियावरील शिवसेनेच्या अधिकृत पेजवरून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळूनच हा मेळावा साजरा होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर होणारा हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिवसैनिकांसाठी या मेळाव्याचे महत्त्व अधिकच आनंददायी आणि उत्साहवर्धक आहे.

स्थळ
स्वातंत्र्यवीर सावरकर सभाग़ृह, शिवाजी पार्क
वेळ
सायं. 6.00 वा.

इथे होणार प्रक्षेपण-

https://twitter.com/shivsena?s=11
https://www.youtube.com/c/ShivSenaOfficial
https://www.facebook.com/Shivsena/