
सामना ऑनलाईन, पंढरपूर
स्वाभिमानी शेतकरी संघटना आता भाजपबरोबर जाणार नाही. शिवसेना सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिल्याने आमच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये शिवसेनेविषयी सहानुभूतीची भावना आहे. त्यामुळे आघाडी करायचीच झाल्यास शिवसेना हाच आमच्यासमोर पहिला पर्याय असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज पंढरपूरमध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी स्वाभिमानीचे युवा नेते रविकांत तुपकर, रणजित बागल उपस्थित होते.
खासदार शेट्टी म्हणाले, खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत आहेत, मात्र आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जशास तसे उत्तर देण्याची क्षमता आहे. आम्ही हाडाचे शेतकरी असून पिकांवर आलेल्या रोगांवर कोणते औषध फवारायचे आणि पीक कसे वाचवाचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. सदाभाऊ हा तर छोटा व्हायरस आहे. फार तापदायक नाही. आम्ही त्याचा निश्चित बंदोबस्त करू, असा टोला खासदार शेट्टी यांनी लगावला.
सदाभाऊच्या पोलीस बंदोबस्ताबाबत बोलताना खासदार शेट्टी यांना ‘कोण होतास तू, काय झालास तू’ या गाण्याच्या दोन ओळी गाऊन सदाभाऊंची खिल्ली उडवली. कधीकाळी एसटीने फिरणाऱ्या सदाभाऊंना आज पोलीस बंदोबस्तात फिरावे लागते आहे. मी आज देशभर फिरतो, पण मला पोलीस बंदोबस्ताची गरज भासत नाही. मात्र सदाभाऊंना पोलीस बंदोबस्तात का फिरावे लागते याचे आत्मचिंतन त्यांनीच करायला हवे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, येत्या २९ जूनला पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानीचा भव्य शेतकरी मोर्चा काढणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.




























































