रावसाहेब दानवे विचित्र आणि धोकेबाज माणूस, युती काळातही त्यांनी मला धोका दिला होता – चंद्रकांत खैरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच या भेटीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. रावसाहेब दानवे विचित्र, धोकेबाज माणूस असल्याचे खैरे म्हणाले. तसेच अर्जुन श्रीकृष्णाचेच म्हणजे उद्धव ठाकरे यांचेच ऐकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

रावसाहेब दानवे विचित्र, धोकेबाज माणूस आहे. शिवसेना- भाजपाची युती असतानाही त्यांनी मला धोका दिला, असे खैरे म्हणाले. दानवेंनी आपल्या स्वत:च्या मुलीचा संसार मोडल्याचा आरोपही खैरेंनी केला आहे. जालना जिल्ह्यातील अनेक लोकांचा दानवेंवर विश्वास नाही. ते क्षणाक्षणाला आपलं वक्तव्य बदलतात. भाजपाकडून शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून दबाब टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच फटका खोतकरांना बसला असल्याचे खैरे म्हणाले.

अर्जुन खोतकरांनी त्यांच्या ईडीच्या कामासाठी दिल्लीला जात असल्याची कल्पना आपल्याला दिली होती. अर्जुन खोतकर हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. त्यांचं नाव अर्जुन असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना श्रीकृष्णासारखे आहेत. त्यामुळे खोतकर उद्धव ठाकरेंचचं ऐकतील असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला आहे. अर्जुन खोतकर एकच व्यक्ती आहे जी रावसाहेब दानवेंना सरळ करु शकते, असा टोलाही खैरेंनी दानवेंना लगावला आहे.