मिंधे-फडणवीस सरकार 15 दिवसांत कोसळणारच; शिवसेना नेते संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मिंधे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत हे सरकार कोसळेल, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला.

रविवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सुवर्णनगरीतले काही दगड आमच्या सोबत होते, मात्र ते दगडच निघाले, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली. कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना जिह्याच्या पालकमंत्र्यांनी 400 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्याची कागदपत्रे माझ्याजवळ आहेत. विधानसभेत व विधान परिषदेत याबद्दल प्रश्न उपस्थित झाले. मात्र हे प्रकरण दाबण्यात आले. पुढच्या पंधरा दिवसांत हे सरकार कोसळेल, सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे, त्यावर सही व्हायची बाकी आहे, पुष्पचक्र अर्पण करा, असेही ते म्हणाले.

फडणवीस हे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे. त्यांच्या मनात दुसरे मुख्यमंत्री असतील तर त्यांना बसवा, असे संजय राऊत म्हणाले. विखे-पाटलांनी खूप वेळा कन्फ्यूज केले आहे. आधी ते काँग्रेस पक्षात होते, मग ते शिवसेनेत आले. शिवसेनेत मंत्रिपदे उपभोगली. त्यानंतर दुसऱया, मग तिसऱया पक्षात गेले. त्यांच्या भूमिकांमध्ये गोंधळ आहे. उद्या राज्यात सत्तापालट झाल्यास राधाकृष्ण विखे-पाटील आणखी एखाद्या पक्षात जातील. असे संजय राऊत म्हणाले.