अर्ध्या तासात रस्त्यावरील दुभाजक बसले जागेवर, कोपरगाव पालिकेविरोधात शिवसेना ‘ऍक्शन मोड’वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा झाल्यापासून पक्ष बळकट करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत. दोन महिन्यांपासून कोपरगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील दुभाजक नगरपालिकेने अस्ताव्यस्त ठेवले होते. त्यामुळे आज शिवसेनेचे पदाधिकारी ऍक्शन मोडवर येत भरदुपारी उन्हात आंदोलनाला सुरुवात केली. यामुळे पालिका हडबडून जागी झाली आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी दुभाजक जागेवर बसविण्यास सुरुवात केली.

शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजक नगरपालिकेने गेल्या दीड महिन्यापासून रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्तपणे कोठेही ठेवले होते. त्यामुळे या भागातील व्यापाऱयांना धंद्याला त्रास होत होता. तसेच वाहने रस्त्यावर लावावी लागत होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. या दुभाजकांमुळे व्यापारी व सायकलधारक, पादचारी महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याप्रकरणी व्यापाऱयांनी अनेकदा कोपरगाव नगरपालिकेला निवेदने दिली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने व्यापाऱयांनी शिवसेनेकडे हा प्रश्न  सोडविण्याची मागणी केली होती.

याची दखल घेत आज शिवसैनिकांनी भरउन्हात जोपर्यंत दुभाजक जागेवर ठेवले जात नाहीत, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन सुरू केले. दोन महिन्यांपासून व्यापाऱयांना न जुमानणाऱया पालिकेचे अधिकारी अवघ्या अर्ध्या तासात क्रेनसह हजर होत दुभाजक जागेवर लावण्याचे काम सुरू केले. त्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले.  शिवसेनेने केलेल्या आंदोलनाबद्दल नागरिकांतून समाधान व आभार व्यक्त करण्यात येत आहे.

या आंदोलनामध्ये माजी शहरप्रमुख भरत मोरे, माजी उपशहरप्रमुख गगन हाडा, राहुल हाडा, कान्हा हाडा, बिनय टाक, प्रसाद काळवाघे, ओम ठोंबरे, अतुल बारहाते, गोटू पटेल, गौतम निंदाने, जीवन बारहाते, गणेश भसाळे, लोकेश हाडा, दीपेश वाघमारे, यश मोरे, भैया वालझाडे, नीलेश वाणी आदी उपस्थित होते.