…नाहीतर नगर परिषद कार्यालयात डुकरे सोडू, शिवसेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ

शहरातल्या जिजामाता उद्यानाचे शॉपिंग कॉम्पलेक्स तयार करताना गुत्तेदाराने उद्यानाचे गेट तोडले परंतू बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूचे गेट बांधले नाही त्यामुळे उद्यानात मोकाट जनावरे, डुकरांचा वावर वाढला असून उद्यानात सर्वत्र अस्वच्छता आहे. उद्यानातील डुकरांचा बंदोबस्त करून उद्यानात स्वच्छता न ठेवल्यास परळी शिवसेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयात डुकरे सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. एका निवदेनाद्वारे वैजनाथ सोळंके यांनी हा इशारा दिला आहे.

जिजामाता उद्यान हे परळी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे व परळीचे वैभव समजले जाते. परंतू अशा या सुंदर अशा उद्यानाची दुरावस्ता केली आहे. उद्यानामध्ये मोकाट जनावरे, डुकरे, कुत्रे,गाढव आदींचा मोठ्या प्रमाणात वावर झाला असून त्यामुळे उद्यानात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. सकाळ, संध्याकाळ नागरीक या उद्यानात मोकळा श्वास घेण्यासाठी जातात परंतू या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने व डुकरांच्या वावर वाढल्याने नागरिकांनी जाणे कमी केले आहे. मोकाट फिरणारी डुकरं कधी नागरीकांचा, लहान मुलांचा चावा घेतील सांगता येत नाही. उद्यानाची देखरेख करणारे कर्मचारी व निरिक्षक उद्यानाला गेट नसल्याने त्रस्त झाले आहेत.

शॉपिंग कॉम्पलेक्स बांधून अगोदरच उद्यानाचे वैभव संपुष्टात आणले असून त्यामध्ये गेट नसल्याने राहिले सुरलेले उद्यानही संपूष्टात येत आहे. म्हणून परळी शिवसेनेच्या वतीने उद्यानाची दयनीय अवस्था व विटंबना करणार्‍या न.प.प्रशासनाचा निषेध करण्यात येत असून त्वरीत उद्यानाचे गेट बसवून वराहांचा व स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडविला नाही तर नगर परिषद कार्यालयात डुकरे सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा परळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके यांनी दिला आहे.