गद्दारीला गाडून हिंगोलीवर शिवसेनेचा भगवा फडकविणार – आनंदराव जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शिवसेनेसोबत ज्यांनी-ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्यावर राजकीय बेरोजगार होण्याची पाळी आली असून महायुतीचे हिंगोलीतील उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील हे सुशिक्षीत व निष्ठावान शिवसैनिक आहेत. गद्दारीला गाडून हिंगोली मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. भगव्याची शान वाढविण्यासाठी झोकून देऊन प्रचारात मागे राहू नका, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी केले.

शिवसेनेचे हिंगोली लोकसभा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे मागील ८ दिवसापासून नांदेड व हिंगोलीत तळ ठोकून बसले असुन प्रचाराबाबत शिवसैनिकांना वेळोवेळी जाधव हे मार्गदर्शन करत आहेत. आखाडा बाळापुर येथे आज जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजपा महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडल्यावर त्यांनी घणाघाती भाषण करत काँग्रेसचा बुरखा फाडला.

नांदापुर सर्कलमध्ये झंझावती प्रचार दौरा
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी मंगळवारी महायुतीचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी विविध गावात प्रचारफेरी काढून नागरिकांशी संवाद साधला. नांदापुर तसेच कळमनुरी तालुक्यातील सावंगी बु., रेणापुर, सोडेगाव, जांभरुन, वारंगा मसाई, कळमकोंडा खुर्द, ग्रामवाडी, पाळोदी, कुंभारवाडी, चाफनाथ, सांडस, सालेगाव, हरवाडी या गावांमध्ये भेटी देऊन घरोघरी जात शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले. सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत संतोष बांगर यांनी झंझावती दौरा करत शिवसेनेच्या मागे मतदारांची ताकद उभी करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. शिवसेनेच्या केलेल्या कार्याविषयी माहिती देखील त्यांनी दिली.

युवासैनिक सरसावले
हिंगोली लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी युवासेनेचे लोकसभा विस्तारक अमित गिते, युवासेना जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी बाजीराव सवंडकर यांच्यासह गजानन भोसले, लखन शिंदे, मुन्ना यादव, प्रवीण महाजन, हे सारेच पदाधिकारी विविध गावात भेटी देऊन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. दिलीप घुगे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा, निशाणा, आसोंदा, दुधाळा यासह सिध्देश्वर सर्कलमधील वेगवेगळ्या गावात जाऊन युवक व नागरिकांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कामाची माहिती युवासैनिक देत आहेत.

शिवसेनेच्या रणरागिनीही मैदानात
शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या रुपाली राजेश पाटील गोरेगावकर, राजश्री हेमंत पाटील, सुनिता मुळे, माजी जि.प. अध्यक्षा मिनाक्षी बोंढारे, महिला आघाडी जिल्हा संघटक किर्ती लदनिया, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, महिला व बालकल्याण सभापती रेणुका जाधव यांच्यासह शिवसेनेच्या रणरागिनी महायुतीच्या विजयासाठी मैदानात उतरल्या आहेत. हिंगोली शहरामध्ये आज विविध ठिकाणी भेटीगाठी देऊन राजश्री पाटील यांनी महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शिवसेना व महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक, बांधकाम सभापती श्रीराम बांगर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी भोईगल्ली येथे झालेल्या महिलांच्या बैठकीला उपस्थित होते.