शिवतीर्थावर उसळला भक्तीचा महासागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात मनामनात मराठी अस्मितेचा स्वाभिमान जागवणारे, हिंदुस्थानात जहाल हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो, करोडो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांचे दैवत. शिवसेनाप्रमुखांच्या दहाव्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून शिवतीर्थावर भक्तीचा महासागर उसळला होता. ‘माझा भाव तुझे चरणी…तुझे रूप माझे नयनी’ अशा भावनेने हजारो शिवसैनिकांनी भक्तिभावाने आपल्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. ‘मी तो जडलो तुझिया पाया’ म्हणत स्मृतिस्थळावर पुष्पांजली वाहत ते नतमस्तक झाले. ‘गद्दारांना गाढण्या शक्ती द्या’ असे म्हणत स्मृतिस्थळावरील माती त्यांनी विभुतीप्रमाणे मस्तकी लावली.  हजारो शिवसेनाप्रेमी नागरिकांनीही लाडक्या साहेबांना पुष्पांजली अर्पण करून त्यांना मानवंदना दिली.

हजारो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिक आज सकाळपासूनच शिवतीर्थावर दाखल झाले होते. शिवतीर्थावरील साहेबांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहण्यासाठी रांगा लागल्या होत्या. स्मृतिस्थळी लावलेली लाडक्या साहेबांची तसबीर पाहून त्यांचे हात आपोआप जोडले जात होते. स्मृतिदिनानिमित्त शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या चाफ्याच्या फुलांचा दरवळ घुमत होता. अनेक शिवसैनिक, नागरिक आणि मान्यवरांनी स्मृतिस्थळी चाफ्याची फुले आणि हार अर्पण करून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना वंदन केले.

शिवसेनाप्रमुखांचे विचार हे नेहमीच मराठी माणसाला आणि हिंदूंना अन्याय–अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत असतात. त्यांनी प्रत्येकाच्या हृदयात शिवरायांचा अभिमान जागवला. देव, देश, धर्मासाठी जगण्याची, लढण्याची प्रेरणा दिली. अखंड हिंदुस्थान भगव्या झेंडय़ाखाली आणण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत स्फूर्ती देत राहिले. आजही ती स्फूर्ती त्यांच्या स्मृतिस्थळावरून मिळत आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी शिवतीर्थावर भक्ती आणि शक्तीचा संगम झाला होता.