लिंबू घेण्यासाठी सुट्टे पैसे दिले नाहीत, दुकानदाराने ग्राहकावर झाडली बंदुकीची गोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लिंबाच्या वाढत्या दरामुळे लोकांना सरबताऐवजी साध्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असतानाच, राजस्थानातील डीग पोलीस ठाण्याजवळील बहज गावात एक धक्कादायक घटना घडली. येथे 5 रुपयाचे लिंबू घेण्याकरिता ग्राहकाने सुट्टे पैसे दिले नाहीत, म्हणून दुकानदाराने ग्राहकावर चक्क बंदुकीची गोळी झाडली.

राजस्थानातील भरतपूर येथील बहज गावात दिनेश (30) नावाची व्यक्ती सायंकाळी बाजारात लिंबू विकत घेण्याकरिता गेली होती. बाजारातील महेंद्र बच्चू यांच्या दुकानात जाऊन दिनेशने 5 रुपयाचे एक लिंबू विकत घेण्याकरिता दुकानदाराला 100 रुपयांची नोट दिली. यामुळे दिनेश आणि महेंद्र दोघांमध्ये वादविवाद झाले. दोघांचे भांडण बराच वेळ सुरू होते. त्यानंतर ते इतके विकोपाला गेले की, दोघेही एकमेकांना शिव्या देऊ लागले. त्यानंतर दुकानदार महेंद्र त्याचा लहान मुलगा भोलू आणि मित्रांसह रात्री 8.30 वाजता दिनेशच्या घरी लाठी, काठी आणि बंदुक घेऊन गेला. त्याच्या घरी जाऊन त्याला शिव्या देऊ लागला. त्यानंतर त्याने दिनेशला बंदुकीची गोळी घातली. या गोळीबारात जखमी झालेल्या दिनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस दुकानदार आरोपी महेंद्र आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

सोशल मिडियावर हे प्रकरण चर्चेचा विषय बनले असून 5 रुपयांच्या लिंबाकरिता बंदुकीची गोळी झाडून ग्राहकाला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदाराबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत.