
कोरोनाचे अंधारमय संकट जगासमोर उभे असतानाच प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीला आजपासून सुरुवात झाली. त्याचबरोबरच वाढत्या महागाईमुळे खरेदी कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना मुंबईकरांनी मात्र सर्व दावे फोल ठरवत जोरदार खरेदी केली. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आल्यामुळे पूजेसाठी लागणाया फळे, फुले अशा साहित्यासोबत दागिने, फराळ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम अप्लायन्स, स्मार्टफोनची खरेदी करण्यासाठी आज मॉल्स, शॉपिंग सेंटरसह बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली.
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. मात्र, कोरोना नियंत्रणात आल्यामुळे दिवाळीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या असून प्रत्येकाने आपापल्या बजेटनुसार खरेदी केली. स्वस्तात मस्त पर्याय म्हणून मध्यमवर्गीयांनी स्ट्रीट शॉपिंगला पसंती होती तर तरुणाईची पसंती ऑनलाईन शॉपिंगला होती. सणासुदीनिमित्त वाहन कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक ऑफर्समुळे दुचाकी-चारचाकी वाहनांची विक्रीही तेजीत झाली. अनेकांनी नवरात्रीपासून वाहनांचे बुकिंग केले होते. दरम्यान, सोन्याचे दर 50 हजारांपेक्षा कमी असल्याने सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी सराफा बाजारात गर्दी केली होती. गुंतवणुकीबरोबर लग्नसराईसाठीही मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली.
मुहूर्त ट्रेडिंगमुळे बाजारात तेजी
मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर मुहूर्त ट्रेडिंग करण्यात आले. त्यामुळे बाजारात तेजी आली आणि शेअर बाजाराने पुन्हा 60 हजारांचा टप्पा ओलांडला. आज बाजार 436 अंकाच्या वाढीसह 60 हजार 207 पातळीवर पोहोचला. दिवाळीत लक्ष्मी पूजनादिवशी शेअर बाजार केवळ पूजेसाठी तसेच एका तासाच्या व्यवहारासाठी उघडतो यालाच मुहूर्त ट्रेडिंग म्हटले जाते. या दिवशी शेअर्सची खरेदी करणे शुभ मानले जाते.
फटाक्यांसाठी झुंबड
मुंबईतील अनेक प्रसिद्ध फटाक्यांच्या दुकानांसमोर ग्राहकांची बुधवारपासून झुंबड उडाली होती. आजही मोठया प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. काळाचौकी येथील शिंदे बंधूंचे प्रसिद्ध फटाक्यांचे दुकानात तर मोहम्मद अली रोडवरील इसाभाई यांच्या दुकानाबाहेर गर्दी झाली होती. मुंबईकरांनी पर्यावरणपूरक फटाक्यांना पसंती दिली. मोठय़ा आवाजांच्या फटाक्यांऐवजी कमी प्रदूषण करणाऱया शोभिवंत फटाक्यांना पसंती देण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे फटाक्यांची विक्री होईल का, अशी भीती घाऊक व्यापाऱयांना होती. त्यामुळे या वर्षी कमी प्रमाणात फटाके मागवण्यात आले. मात्र, मुंबईकरांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
































































