मोनेगिरी : पिंकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>संजय मोने

आजची पिंकी ‘ती पिंकी’ नसून या लेखाचा नायक ‘तो पिंकी’ आहे. त्याचं ‘पिंकी’ हे आईवडिलांनी किंवा आत्यानं ठेवलेलं नाव नसून टोपणनाव आहे आणि ते त्याला त्याच्या स्वभावामुळे त्याच्याच मित्रांनी बहाल केलं आहे. हा पिंकी (खूप वेळ डोपं खाजवलं, पण काहीही केल्या त्याचं खरं नाव आठवत नाही. खरं सांगायचं तर त्याची गरजही नाही. त्याचं ‘पिंकीत्व’ त्यानं केलेल्या गोष्टींतून लक्षात येईल). पिंकी काही माझा लहानपणीचा मित्र अजिबात नव्हता. कॉलेजला आल्यावरही त्याला पाहिल्याचं किंवा भेटल्याचं आठवत नव्हतं. आम्हाला मित्रांना तो दिसला कॉलेजच्या पॅण्टीनमध्ये.

शीर्षकावरून हा लेख एखाद्या मुलीबद्दल असेल असं वाटलं तर त्यात काही नवल नाही, परंतु आजची पिंकी ‘ती पिंकी’ नसून या लेखाचा नायक ‘तो पिंकी’ आहे. त्याचं ‘पिंकी’ हे आईवडिलांनी किंवा आत्यानं ठेवलेलं नाव नसून टोपणनाव आहे आणि ते त्याला त्याच्या स्वभावामुळे त्याच्याच मित्रांनी बहाल केलं आहे. हा पिंकी (खूप वेळ डोपं खाजवलं, पण काहीही केल्या त्याचं खरं नाव आठवत नाही. खरं सांगायचं तर त्याची गरजही नाही. त्याचं ‘पिंकीत्व’ त्यानं केलेल्या गोष्टींतून लक्षात येईल). पिंकी काही माझा लहानपणीचा मित्र अजिबात नव्हता. कॉलेजला आल्यावरही त्याला पाहिल्याचं किंवा भेटल्याचं आठवत नव्हतं. आम्हाला मित्रांना तो दिसला कॉलेजच्या पॅण्टीनमध्ये. त्या काळात आमच्या पॅण्टीनमध्ये तुमचा विश्वास बसणार नाही, वीस पैशांत बटाटेवडा, सांबार मिळायचा आणि दहा पैशांत दोन पाव. मस्त तीस पैशांत पोटभर खाणं व्हायचं. कुणाला हवं असेल तर अधिकचं म्हणजे एक्स्ट्रा सांबार, तर ते फुकट मिळायचं. का कुणास ठाऊक, पण पॅण्टीनच्या माणसाने एक दिवस मेन्यू बोर्डवर एक्स्ट्रा सांबार दहा पैसे असं लिहिलं आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये एकच गदारोळ उडाला. आज दहा पैसे नगण्य वाटतील. चाळीस वर्षांपूर्वी दहा पैशाला किंमत होती. पॅण्टीनमध्ये या भाववाढीबद्दल चर्चा सुरू झाली. काय आणि कसं करून ते सांबारचे पैसे नष्ट कसे करता येतील यावर विविध मार्गी चर्चा झाली. सगळे आपापली मते मांडत होती. पिंकी म्हणाला,
‘‘मी एक सांगू?’’
एक वरच्या वर्गातला मुलगा म्हणाला,
‘‘काय सांगणार? आता आता कॉलेजात आलायस, उगाच आपल्या मताची पिंक टाकू नकोस.’’
‘‘मी उद्याच बंदोबस्त करतो. फक्त तुम्ही मला साथ द्या.’’
वरिष्ठ मुलगा ओरडला ‘‘ए! पिंक्या गप रहा. आम्ही सीनियर्स बघू काय ते!’’
विषय संपला. सगळे उद्या काहीतरी करूयाच म्हणून आपापल्या घरी गेले (त्या काळात कॉलेज संपलं की, लगेच घरी जाण्याची अनिष्ट प्रथा होती. आता ती बंद झाली.)
दुसऱया दिवशी भल्या सकाळी कॉलेजात पिंकी आल्याबरोबर पॅण्टीनमध्ये गेला. पाच-पन्नास विद्यार्थी होते. काऊंटरवर जाऊन त्याने पाच रुपयांची नोट पुढे सरकवली.
‘‘पन्नास प्लेट एक्स्ट्रा सांबार द्या.’’
कॉलेजच्या दारावर खबर आली, एक्स्ट्रा सांबारवरून भांडण चाललंय.
पिंकीचं म्हणणं होतं, मेन्यूमध्ये एक्स्ट्रा सांबार लिहिलंय तेवढंच द्या. वाद पेटला. वरिष्ठ विद्यार्थी आणि मित्रही पेटले. ‘एक्स्ट्रा सांबार दहा पैसे’ असं लिहिलेलं पुसलं गेलं. कोणी केलं हे, तर पिंकीनं. कोण पिंकी? मताची पिंक टाकून गेला तो. एका घटनेने तो कॉलेजभर प्रसिद्ध झाला आणि त्याचं नावही. दोन-तीन महिन्यांनी कॉलेजच्या निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर झाली. दोन-तीन गट होते. त्यातल्या एका गटात पिंकी होता. उमेदवारांचे बॅनर झळकले. एका गटानं लिहिलं होतं, स्वच्छ आणि पारदर्शी कारभार हवा असेल तर आम्हाला निवडून द्या. आता याला प्रत्युत्तर काय द्यायचं? आपण काय आश्वासनं द्यायची? वरिष्ठ विद्यार्थ्याने त्याच्या गटाच्या मीटिंगला सुरुवात केली.
कोणी ‘आपण असं करू या’, तर कोणी ‘आपण तसं करू या’ म्हणून सुचवलं.
‘‘पिंक्या! काय करू या?’’
‘‘स्वच्छ आणि पारदर्शी कारभार हवा असेल तर…’’
‘‘अरे, त्यांनी तेच सांगितलंय.’’
पिंकीला एकानं अर्ध्यावर अडवलं.
‘‘पूर्ण बोलू द्याल?’’
वरिष्ठ विद्यार्थी खेकसला.
‘‘गप्प बसा सगळे. पिंकी तू बोल.’’
पिंकीने खिशातून एक पेपर काढला. त्यात एक बातमी होती, ‘कनिष्ठ अभियंता चांडक यांना लाच घेताना अटक.’
‘‘याचं काय करू?’’
पिंकी शांतपणे म्हणाला,
‘‘उमेदवार पैवल्य चांडकचे वडील आहेत हे.’’
वरिष्ठ विद्यार्थी चिडला.
‘‘आयला, बापाने लाच घेतली, त्याचा इथे काय संबंध?’’
‘‘त्यांचा बॅनर लावलेला आहे, त्याच्या खाली हे लावा आणि लिहा- हे पैवल्यचे वडील आहेत. ज्यांच्या घरात लाच खाल्ली जाते तो स्वच्छ कारभार कसा करणार? सोपे आहे.’’ बॅनरखाली बातमीच्या कॉप्या चिकटवल्या गेल्या आणि निवडणुकीत चांडक आपटला. पिंकीची पिंक कामी आली. त्यानंतर कॉलेजात कुठेही कसलाही वाद झाला की, आम्ही ओळ्खायचो, पिंकीने आपल्या मताची पिंक टाकली असणार.
‘‘माकडाचा माणूस झाला असं विज्ञान सांगतं.’’ त्याचे शिक्षक वर्गात शिकवत होते. शंका विचारण्यासासाठी पिंकीने हात वर केला.
‘‘बोला’’ शिक्षक म्हणाले.
‘‘तुम्ही म्हणता माकडांची माणसं झाली असतील…’’
पिंकीचं वाक्यं अर्ध्यावर तोडत शिक्षक म्हणाले,
‘‘मी नाही मूर्खा! डार्विनचा सिद्धांत तसं सांगतो.’’ त्याचं वाक्य अर्ध्यावर तोडलं तर पिंकीला राग यायचा.
‘‘सर! तुमचं बरोबर आहे, पण मग जर माणसांची माकडं होत असतील तर अजून जगात असंख्य माकडं आहेत, त्यांची माणसं कधी होणार?’’
शिक्षक या ज्ञानाच्या पिंकेवर काय बोलणार? पिंकीला वर्गाबाहेर काढलं गेलं.
राखी पौर्णिमा होती. सगळे राख्या बांधून कॉलेजला आले. पिंकीचा हात मोकळा होता.
‘‘बहीण घरी येऊ नको म्हणाली.’’
‘‘का?’’
‘‘तिच्या सासऱयांना फुटबॉल खूप आवडतो. त्यांच्याशी गप्पा मारत होतो.’’
‘‘पण तुला फुटबॉलमधलं काय कळतं?’’
‘‘शून्य! पण मला माहिती आहे ते. बहिणीच्या सासऱयांना वाटतं, आपल्याला कळतं.’’
‘‘मग?’’
एक दिवस हा पिंकी बहिणीच्या घरी गेला तिला भेटायला. हे वरवरचं कारण. त्याला त्या म्हाताऱया सासऱयाची खोड मोडायची होती.
‘‘मग काय? उगाच पिकवत बसतो. कुठला तरी सामना बघत होता. मी विचारलं त्यांना, ‘किती स्कोर झालाय? सेंच्युरी केली का कुणी?’ अत्यंत क्षुद्र नजरेनं माझ्याकडे पाहत ते म्हणाले, ‘जुनी मॅच बघतोय पेलेची.’ त्यावर मी म्हणालो, ‘पेले? आमच्याकडे पाणी प्यायला आम्ही पेले वापरतो.’’
‘‘बाप रे! मग?’’ मी विचारलं.
‘‘सासऱयाचा रागाने श्वास अडकला. डॉक्टर बोलवावे लागले. बहीण म्हणाली, यापुढे ते असताना घरी येऊ नकोस.’’
आता सध्या पिंकी पुण्यात स्थायिक झालाय. मध्ये एकदा तिथे भेटला.
‘‘काय मग? कसं काय वाटतंय?’’
‘‘अरे, इथे तर माझ्याहून मोठेमोठे पिंकी आहेत. आपला इथे टिकाव लागणं अशक्य आहे.’’
मी विचारलं, ‘‘म्हणजे?’’
‘‘जरा ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झालाय. डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी गोळी लिहून दिली. ही बघ!’’
त्याने कागद दाखवला. त्यात लिहिलं होतं,
‘‘सकाळी एकदा ईश्वरचरणी देह ठेवेपर्यंत.’’

(लेखक ज्येष्ठ अभिनेता आहेत.)