
अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील नवनवीन गोष्टी पोलीस तपासातून पुढे येत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर नराधम आफताब पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. क्रूरतेचा कळस म्हणजे, श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये असताना आफताब त्याच फ्लॅटमध्ये दुसऱ्या मुलीसोबत रोमान्स करत होता. आफताबने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वसईच्या श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या घटनेमुळे अवघा देश हळहळला. आता याप्रकरणी पोलीस तपासाला वेग आला असून नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.
श्रद्धाच्या हत्येनंतरही काही घडलेच नाही अशा थाटात आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहायचा. श्रद्धाच्या हत्येनंतर त्याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ज्या डेटिंग अॅपवरून श्रद्धा आणि आफताबची ओळख झाली त्याच अॅपवरून त्याची दुसऱ्या मुलीसोबत ओळख झाली होती. श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये असताना त्याच रूममध्ये आफताब दुसऱ्या मुलीसोबत संबंध ठेवत होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. आफताब आतापर्यंत या डेटिंग अॅपवरून किती मुलींना भेटला, श्रद्धाच्या हत्येचे कारण यापैकी एखादी मुलगी तर नाही ना या दृष्टीनेदेखील पोलीस तपास सुरू आहे.
…तर श्रद्धा जिवंत असती, शोकाकुल हतबल वडिलांची व्यथा
अत्यंत निर्दयपणे झालेल्या मुलीच्या खुनाचा धक्का कुटुंबीय पचवू शकलेले नाहीत. लिव्ह इनमध्ये राहू नको, परप्रांतीय मुलाची पूर्ण ओळख नसताना दिल्लीला राहायची घाई करू नको, असे वारंवार सांगूनही मुलीने ऐकले नाही. वेळीच आमचे ऐकले असते तर आज श्रद्धा जिवंत असती, अशी हतबलता वडील विकास वालकर यांनी शोकाकुल होऊन व्यक्त केली. चार महिन्यांपासून आई-वडील श्रद्धाला घरी येण्यासाठी फोनवरून विनवणी करत होते. यावर लग्न करून मी लवकरच घरी येईन असे श्रद्धा सांगत होती. मात्र ती जिवंतपणी आली नाही. किमान तिचे पार्थिव तरी अंत्यसंस्कारासाठी मिळावे, असा आईचा हंबरडा सांत्वनासाठी आलेल्यांचे हृदय पिळवटून टाकत आहे.
दीड आठवडय़ापूर्वी हत्येचे प्लॅनिंग
माझे श्रद्धासोबत जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे हत्येच्या दीड आठवडा आधीच मी तिला मारण्याचा प्लॅन बनवला होता. आमच्या भांडणाचे कारण माझे इतर कुणाशी पह्नवर बोलणे असायचे. तिला माझ्यावर संशय होता. त्यामुळे ती माझ्यावर चिडायची. 18 मे रोजी आमचे भांडण झाले आणि मी त्याच दिवशी तिची हत्या केली, असे आफताबने आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे.
‘लव्ह जिहाद’चा संशय
या प्रकरणात मला लव्ह जिहादचा संशय येत आहे. दिल्ली पोलीस योग्य दिशेने तपास करतील यावर माझा विश्वास आहे. श्रद्धा माझ्याशी बोलत नसे, पण ती काकाच्या संपका&त होती. आफताबला फाशीची शिक्षा मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले.
पोलिसांची जंगलात अडीच तास शोधमोहीम
दिल्ली पोलीस मंगळवारी दुपारी आफताबला घेऊन महरौलीच्या जंगलात पोहोचले. तिथे त्यांनी श्रद्धाच्या हत्येप्रकरणी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत श्रद्धाच्या शरीराचे दहा तुकडे पोलिसांनी जप्त केले आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्र्ााचा पोलीस शोध घेत आहेत. श्रद्धाची हत्या होऊन सुमारे सहा महिने उलटल्यामुळे मृतदेहाचे तुकडे कुजलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे तपास करताना फॉरेन्सिक लॅबचा कस लागणार आहे. रक्तपेशी, हाडे यांच्या आधारे पुरावे गोळा करण्याचे काम फॉरेन्सिक टीमकडून सुरू आहे.
पुरावे मिटवण्यासाठी गुगलची मदत
18 मे 2022 रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर मृतदेहाची कशा प्रकारे विल्हेवाट लावायची यादृष्टीने आफताबने प्लॅनिंग सुरू केले. फरशीवरील रक्ताचे डाग कसे पुसावेत, रक्ताने माखलेल्या कपडय़ांची कशी विल्हेवाट लावायची या गोष्टी त्याने गुगलवर सर्च केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय इंटरनेटवर मानवी शरीर रचनेबाबत वाचून त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले.
श्रद्धाचे इन्स्टाग्राम अकाऊंट वापरायचा
एकीकडे आफताब श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता, तर दुसरीकडे ती जिवंत असल्याचे तिच्या मित्र-मैत्रिणींना भासवण्यासाठी तो तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट वापरायचा. तिच्या अकाऊंटवरून पह्टो लाइक करणे यासारख्या गोष्टी तो करायचा. श्रद्धा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता.
15 दिवसांपूर्वीच आफताब वसईत
आफताबचे कुटुंबीय वसईत राहत होते. 15 दिवसांपूर्वीच त्याचे कुटुंबीय मीरा रोड येथे स्थायिक झाले आहेत. वसईतील हा फ्लॅट एक आठवडय़ापूर्वीच भाडय़ाने देण्यात आला असून शिफ्टिंगच्या वेळेस आफताब वसईतील घरी आला होता.
























































