
तापमानात वाढ आणि बदलत्या वातावरणामुळे हवामान व ऋतुचक्र बदलत आहे. भविष्यात जीवन, हवामान व्यवस्थित व सुरळीत राहावे, यासाठी वसुंधरा संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. यासाठीच वृक्षलागवड वाढावी या हेतूने तुषार प्रताप पानसरे-पाटील या कृषी पदवीधर तरुणाने आपल्या लग्नामध्ये उपस्थित नातेवाईक, मित्रमंडळींना सीताफळाची रोपे देऊन सत्कार केला. ‘आम्ही वृक्ष लागवड करून वसुंधरेचे संरक्षण करू’ अशी शपथही यावेळी देण्यात आली.
तुषार पानसरे म्हणाले, प्रत्येकाने दरवर्षी किमान तीन झाडांची लागवड करावी. अनेकजण जागेअभावी वृक्षलागवड करत नाहीत. प्रत्येकाने वृक्षलागवड करावी म्हणून जगातील सर्वांत मोठी सीताफळ नर्सरी ‘मधुबन फार्म ऍण्ड नर्सरी’ येथून सीताफळाची रोपे खरेदी करून सर्व वऱहाडी मंडळींना वाटलेली आहेत. दिसायला आकर्षक व सोनेरी रंगाचे सीताफळ, चवीला गोड व कमी बियांचे प्रमाण, चारशे ग्रॅम ते एक किलोपर्यंतचे फळ मिळते. या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाला सीताफळ हे फळ खाता येईल. यातून वृक्षलागवड वाढेल या हेतूने आम्ही रोपांचे वाटप केलेले आहे. या समाजोपयोगी उपक्रमासाठी एनएमके -1 गोल्डन या सीताफळ जातीचे निर्माते नवनाथ कसपटे व मधुबन फार्मचे संचालक प्रवीण कसपटे यांनी सामाजिक दायित्व जपत ही रोपे सवलतीच्या दरात दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, कृषी अधिकारी विकास पाटील, श्री विघ्नहर कारखान्याचे तज्ञ संचालक धनेश पडवळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे शास्त्र्ाज्ञ योगेश यादव, माणिक हजारे, राजाराम येवले, जयमाला पडवळ, सरपंच महेंद्र भोर व उपसरपंच बाळासाहेब भोर, रामदास बडे आदी उपस्थित होते.




























































