
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा परिणाम आता जागतिक शेअर बाजार आणि सोने-चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. आठवड्यात व्यवहाराच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या दरात सुमारे 6000 रुपयांनी वाढ झाली. तर सोनेही तब्बल 1500 रुपयांनी वाढले आहे. अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला आहे, तसेच सोने चांदीच्या दराचीही घोडदोड सुरू आहे.
2025 मध्ये दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या होत्या. आता नवीन वर्षात पुन्हा एकदा सोने-चांदीच्या किमती वाढत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या किमतीत १३,००० पेक्षा जास्त वाढ झाली. तर सोन्याचा दर २,४०० पेक्षा जास्त वाढला. व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईमुळे वाढलेल्या जागतिक तणावाचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर झाला आहे.
सोमवारी MCX वर फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होताच, 5 मार्चची एक्सपायरी डेट असलेल्या चांदीच्या किमतीत अचानक वाढ झाली. 1 किलो चांदीचा भाव शुक्रवारी २,३६,३१६ रुपयांवर बंद झाला आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी तो लगेचच २,४९,९०० रुपयांवर पोहोचला. त्यामुळे चांदी एकचा सत्रात १३,४८४ रुपयांनी महाग झाली. सोमवारच्या जबरदस्त वाढीनंतरही चांदी अजूनही त्याच्या सर्वोच्च उच्चांकापेक्षा कमी दरावर व्यवहार करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ते प्रति किलो २,५४,१७४ रुपयांवर पोहोचले होते. अशा परिस्थितीत, चांदीच्या या उच्चांकी पातळीच्या तुलनेत, MCX वर चांदीचे वायदे अजूनही ४,२७४ रुपयांनी स्वस्त आहेत.
चांदी वेगाने व्यवहार करत असताना, सोन्याचीही घोडदौड सुरू आहे. MCX वरील सोन्याच्या दराकडे पाहता गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवसाच्या तुलनेत तो २,४३९ ने वाढला आहे. ५ फेब्रुवारी रोजी संपणाऱ्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा दर गेल्या शुक्रवारी १,३५,७६१ वर बंद झाला आणि सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात १,३८,२०० वर पोहोचला होता.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला तेव्हा तज्ञांनी सोने आणि चांदीच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्यामुळे भू-राजकीय तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे सोनेचांदीच्या दरात तुफानी वाढ झाली आहे. या वाढत्या जागतिक तणावामुळे सोने, चांदी, तांबे, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या दरात आणखी तेजी दिसण्याची शक्यता आहे.



























































