
सामना ऑनलाईन | बँकॉक
थायलंड ओपन जिंकून सायना नेहवालच्या २०१२ च्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे पी व्ही सिंधूचे स्वप्न रविवारी भंगले. गेल्या काही स्पर्धांप्रमाणे जपानच्या नोजोमी ओकुहाराने थायलंड ओपनच्या अंतिम फेरीतही सिंधूला २१-१५ ,२१-१८ असे सहज पराभूत केले. या पराभवाने हिंदुस्थानच्या सिंधूचे थायलंड ओपन जेतेपदाचे स्वप्न चुरचुर झाले. २०१२ मध्ये सायना नेहवालने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकण्याचा पराक्रम केला होता .
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधू आणि जपानची ओकुहारा या दोघींमध्ये आतापर्यंत ११ सामने झाले आहेत .त्यातील ६ लढतींत ओकुहाराने तर ५ लढतींत सिंधूने बाजी मारली आहे. या स्पर्धेत चमकदार खेळ करणाऱ्या सिंधूला रविवारी फायनलमध्ये आपला प्रभाव पाडता आला नाही. त्याचाच लाभ उठवत ओकुहाराने सिंधूच्या जेतेपदाच्या स्वप्नाला सुरुंग लावला.




























































