
सामना ऑनलाईन, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या ३ लाखांपैकी एकही रुपया खर्च झाला नसल्याचं उघड झालं आहे. जिल्हा परिषदेचे आर्थिक वर्ष संपन्यास काही महीने शिल्लक राहिले आहे. असं असताना राखीव निधीतील एक पैसाही खर्च न झाल्याने लाभार्थी योजनाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिप समाज कल्याण समितीची मासिक सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात सभापती सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या मासिकसभेमध्ये प्रचार प्रसिद्धीसाठीचा निधी वाहन दुरुस्तीवर वळता करण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्रचार प्रसिध्दीसाठी तरतूद करण्यात आलेल्या ३ लाख रुपयांपैकी २ लाख रुपये समाज कल्याण विभागाच्या वाहनांवर खर्च करण्याचा निर्णय मासिक सभेत घेण्यात आला. हा निर्णय घेणारे लाभार्थ्यांना योजनाच्या माहितीपासून वंचित ठेवण्याचा घाट घालीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.



























































