रहाडी ग्रामस्थांनी 15 हजार घनमीटर गाळ काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनीधी । येवला  

तालुक्यातील रहाळे ग्रामस्थांनी ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या अभियाना अंतर्गत १५ हजार घनमीटर गाळ काढून शेकडो एकर जमीन सुपीक केली आहे. जलहक्क संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत २० मोठे डंपर आणि २५ ट्रक्टरमधून गाव शिवारात गाळ पोहोचवला आहे.

येवला तालुक्यातील रहाडी हे मराठवाडय़ाच्या सरहद्दीवरील गाव आहे. या गावात पाणीटंचाई कायम आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून ३० किमी अंतरावर असल्यामुळे शासकीय योजनांपासून येथील ग्रामस्थ वंचित राहिले आहेत. गावातील तरुण संगणक अभियंत्यांनी गावातील जल संधारणाच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या कामासाठी शासनाचा २० लाख रुपयांचा निधी मिळवला. जलयुक्त शिवार अभियान गावात राबवून ४० वर्षांपासून फुटून वाहून गेलेला बाळ गंगा बंधारा दुरुस्त केला. धरणरेषा नव्याने बांधली, सांडवा नव्याने बांधण्यात आला आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

जलहक्क संघटन समितीचे भागवतराव सोनवणे यांनी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या कानांवर ही गोष्ट घालून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियान राबण्याची मागणी केली. यानुसार लोकसहभागातून १५ हजार घनमीटर गाळ काढून नाशिक जिह्यात अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. शेकडो एकर जमिनीवर लोकसहभागातून हा गाळ पसरवला गेला आहे. आता पावसाळ्यात दुरुस्ती केलेल्या धरणात ९ दशलक्ष घनफूट पाणी तर अडणार आहेच पण सुपीक जमिनीत मोत्या सारखे पीक ही येणार आहे.