
सामना ऑनलाईन । बोस्टन
झोपेवर लक्ष ठेवणारा सेन्सर बसवलेला स्मार्ट पायजमा शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. हा पायजमा आपण झोपल्यावर आपल्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास, झोपेत होणारी शरीराची हालचाल यावर लक्ष ठेवेल. त्यामुळे माणसाची झोप सुधारण्यास नक्की मदत होईल, असा विश्वास संशोधकांना वाटतोय.
अमेरिकेच्या मॅस्युसेट विद्यापीठातील संशोधकांनी तयार केलेला कॉटनचा स्मार्ट पायजमा आपल्याला चांगली झोप देण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्या काळात ताणतणाव म्हणा किंवा आजारपण यामुळे माणसाच्या झोपेचे खोबरे झालेय. पुरेशी झोप मिळत नाही. अर्धवट झोपेमुळे मानसिक स्वास्थ्य किंवा निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून स्मार्ट पायजमा तयार केला आहे. तो तयार करताना खूप तांत्रिक आव्हाने होती. प्रत्येक दिवशी कपडय़ामध्ये लहान आकाराचे सेन्सिंग घटक आणि पोर्टेबल पॉवर जोडण्याबरोबरच कपडय़ाचा आकार, पोत, आरामदायीपणा, सहजता यामध्ये कुठेही फरक पडणार नाही याची काळजी घ्यायची होती, अशी माहिती संशोधकांच्या टीमचे नेतृत्व करणाऱया त्रिशा अँड्रय़ू यांनी दिली.
कसे चालेल कार्य
स्मार्ट पायजमा तयार करण्यासाठी रिऍक्टिव वेपर डिपोझिशन प्रक्रिया वापरण्यात आली आहे. या पद्धतीत पोलिमर सिंथसाईज केले जाते आणि ते वेपर फेजमध्ये कपडय़ांवर ठेवले जाते. त्याद्वारे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट तयार होऊन त्याचे रूपांतर इंटिग्रेटेड सेन्सर्समध्ये होते.
पायजमाच्या पाच कप्प्यांत सेन्सॉर असून ते सर्व कप्पे सिल्व्हर प्लेटेड नायलॉन धाग्याने जोडलेले आहेत.
प्रत्येक कप्प्यात बटणाच्या आकाराचा प्रिंटेड सर्किट बोर्ड असेल. पायजमाच्या बटणांच्या जागीच हा सर्किट बोर्ड लावला असेल. त्यामुळे हृदयाचे ठोके, शरीराचा रक्तदाब, हालचाली यादृष्टीने नोंदी होतील.




























































