बिबट्याच्या कातडीची तस्करी : दशभुज ट्रॅव्हल्सच्या मालकासह 4 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गुहागर

कोकणातून आणलेल्या बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या टोळीचा वसईत भंडाफोड करण्यात पालघर पोलिसांना यश आले असून पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकाने या टोळीतील 4 जणांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. पोलिसांच्या या कारवाईत गुहागरमधील दशभुज ट्रॅव्हल्स एजन्सीच्या मालकासह दोघांचा समावेश असल्याने गुहागर तालुक्यात खळबळ माजली आहे.

रत्नागिरी जिल्यातील गुहागर तालुक्यातून आणलेल्या बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या 4 जणांना पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडण्यात आले. या मध्ये गजानन कृष्णा देसाई आणि अर्जुन तायडे हे दोघे मिरारोडचे रहिवाशी आहेत. तर अशोक येद्रे आणि प्रवीण वाझे हे दोन गुहागरमधील आहेत. अशोक येद्रे हा नरवण येथील ट्रॅव्हल्स एजंसीचा मालक असून त्याची दशभुज नावाची ट्रॅव्हल्स एजन्सी आहे तर प्रवीण वाझे हा ट्रॅव्हल्स कर्मचारी आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलमध्ये हे आरोपी बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या माहितीवरून या पथकाने हॉटेलमध्ये सापळा लावला होता. एपीआय सुरेंद्र शिवदे या अधिकाऱ्याने वेटरचा वेश परिधान करून आरोपींवर पाळत ठेवली होती. आरोपी डिस्कव्हर मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून पकडले. आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे बिबट्याची कातडी सापडली. त्या कातडीवर 2 गोळ्या लागल्याचे निशाणही आहे.

बिबट्याची कातडी ही 220 cm लांबी, 88 cm लांबीचे शेपूट, 27 cm लांबीचे पुढचे पाय, 33 cm लांबीचे मागचे पाय आणि 97 cm चा छातीचा भाग आहे. कातड्यावर 12 cm लांबीच्या 4 मिशा आहेत. वन्यजीवांची शिकार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकणारी मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या बिबट्याची शिकार कोकणातील गुहागर तालुक्यात झाली आहे काय, झाली असेल तर कुणी केली, बिबट्याची कातडी कुणाला विकणार होते? याचा तपास पोलीस करीत आहेत.

गुहागर तालुक्यात या आधी सुद्धा खवले मांजर तस्करीप्रकरणी गुहागर मधील 1 एकाला अटक करण्यात आली होती. आता चक्क ट्रॅव्हल्स एजन्सीच्या मालकाला अटक झाल्यामुळे ही तस्करी नक्की कधीपासून होत होती याची चौकशी होणे गरजेचे आहे.